
जीएसटी क्रमांक पूर्ववत करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महिला अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया तसेच सीए अक्षय प्रेमचंद लोढा या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान आहे. जालना येथील जीएसटी अधिकारी सुवर्णा लोहिया यांनी वेगवेगळ्या कारणास्तव या दुकानदाराचा जीएसटी क्रमांक बंद करून यासंदर्भात ६ जून रोजी नोटीस पाठवली होती. तक्रारदाराने १७ जुलै रोजी त्यांचे सीए अक्षय लोढा यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर लोढा यांनी जीएसटी क्रमांक पूर्ववत करण्यासाठी लोहिया यांनी १ लाख रुपये मागितल्याचे सांगितले.
तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. पथकाने १७ आणि २१ जुलै रोजी केलेल्या पडताळणीदरम्यान सुवर्णा लोहिया यांनी पंचांसमक्ष १ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ८० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच कर सल्लागार अक्षय लोढा याने लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
आज एसीबीने जीएसटी कार्यालयात सापळा रचून सुवर्णा लोहिया, अक्षय लोढा यांना ६० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. या दोघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांच्या घरांचीही झाडाझडती घेण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, कोमल शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गणेश चेके, मनोहर भुतेकर आदींनी ही कारवाई केली.





























































