चीन कृत्रिम सूर्य बनवतोय, अन् पंतप्रधान मुलांविरुद्ध FIR दाखल करण्यात व्यस्त आहेत, अरविंद केजरीवालांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले शेजारी राष्ट्र चीन तंत्रज्ञानाच्या बळावर कृत्रिम सूर्य निर्माण करून जगाला चक्रावून टाकत आहे, तर दुसरीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मात्र हक्काची मागणी करणाऱ्या निष्पाप मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात व्यस्त आहेत, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी चीनचे उदाहरण देत केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “चीन आज अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर कृत्रिम सूर्य बनवत आहे, भविष्यातील ऊर्जेचे स्रोत शोधत आहे. पण आपल्या देशात काय चालले आहे? पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात जेव्हा आमची लहान मुले, विद्यार्थी रस्त्यावर उतरून स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवतात, तेव्हा हे सरकार त्यांच्यावर लाठ्या उगारते, पॅलेट गन चालवते आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करायला निघते.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना केजरीवाल पुढे म्हणाले की, “मुलांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल करून, त्यांना तुरुंगात टाकून देश कधीच महासत्ता बनू शकत नाही. ज्या देशात तरुण आणि विद्यार्थ्यांचा असा छळ होतो, त्या देशाचा विकास कसा होणार? केंद्र सरकारला देशाच्या भवितव्याची अजिबात काळजी उरलेली नाही. त्यांना फक्त विरोधकांना संपवणे आणि सत्ता टिकवणे एवढाच एककलमी कार्यक्रम उरला आहे.”