
मुंबई महानगरपालिकेतील उधळपट्टीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी X पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना सवाल करत जोरदार टीका केली आहे. सत्तेत बसून सहा महिनेही झाले नसताना सत्ताधाऱ्यांचे नखरे सुरू झाले आहेत. गेल्या चार वर्षांत मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी केली असून, आता भाजपाचे महापौर, मिंधेंचे उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी व बंगल्याची मागणी करत असल्याचे ते म्हणाले आहेत.
लांबून यावे लागते, रस्त्यांवर खड्डे आहेत आणि ट्रॅफिक असतो, अशी कारणे देत या नेत्यांकडून नव्या सुविधा मागितल्या जात आहेत. हा केवळ व्हीआयपी कल्चरचा भाग नसून हे त्यांचे नखरे असल्याचा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी उपमहापौरांनी दक्षिण मुंबईत एक बंगला देण्याची मागणी केल्याचेही आपल्या कानावर आल्याचे त्यांनी नमूद केले. यावरूनच त्यांनी, ‘तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी सांगितले होते की दोन वर्षांत रस्ते खड्डेमुक्त होतील, त्याचे काय झाले?’ असा टोलाही लगावला आहे.
सार्वजनिक वाहतुकीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लाखो मुंबईकर जी लोकल ट्रेन वापरतात, ती भाजपा गेल्या बारा वर्षांत सुधारू शकलेली नाही. या नेत्यांना मेट्रोही वापरायची नाही आणि आपली बेस्ट बस सेवा बंद पाडून ती खाजगी कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा यांचा डाव आहे. हे सगळे बेस्ट बसने का येत नाहीत किंवा ट्रेन्स का वापरत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या उधळपट्टीवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी विचारले आहे की, ह्यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जात आहे? यांना बेस्ट बस वापरू द्या, म्हणजे आमच्या काळात जशी परवडणारी बेस्ट सेवा होती आणि आम्ही बसेसची संख्या १०,००० पर्यंत वाढवत नेत होतो, तशीच स्थिती पुन्हा निर्माण होईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सत्तेत बसून ६ महिने नाही झाले, पण नखरे सुरु!
मुंबई महानगरपालिकेची तिजोरी गेल्या ४ वर्षात रिकामी केलीच. वर आता भाजपाच्या महापौर आणि मिंधेंचे उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी – बंगला मागत आहेत!
VIP कल्चर तर एक, पण हे नखरे बघा! म्हणे लांबून यावं लागतं, खड्डे आहेत,…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 30, 2026




























































