
पेपरफुटी आणि जेन-झी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या मुद्दय़ावरून लोकसभेनंतर राज्यसभेतही आज विरोधकांनी सरकारला घेरले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘अमित शहा गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे कायदा-सुव्यवस्था आहे. असे असताना मुलांवरील अत्याचारावर ते गप्प का? त्यांचं तोंड कोणी शिवलंय?’ असा खडा सवाल खरगे यांनी केला.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेत मांडले, त्यावेळी खरगे बोलत होते. विधेयकाच्या अनुषंगाने बोलताना खरगे यांनी पेपरफुटी आणि ‘जेन-झी’ आंदोलनावरून सरकारवर खरपूस टीका केली. गेल्या 12 वर्षांत अनेकदा पेपर फुटले. अनेक घोटाळे झाले, पण एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. मोदींची गॅरंटी प्रत्येक वेळी फेल ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात 1.25 लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, असा आरोपही खरगे यांनी केला. न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱया मुलांवर पेलेट गनने हल्ले केले. अनेक मुले जखमी झाली. त्यातील काही रुग्णालयात आहेत. कोणाचा डोळा गेला, कोणाचे हातपाय मोडले. सरकारने दोन महिने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळे घडले, असा आरोप खरगे यांनी केला.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाच्या पदावर बसवले जात आहे. ही सगळी मंडळी मनुस्मृतीसमर्थक आहेत. मनुस्मृतीमध्ये क्षुद्रांबद्दल अत्यंत वाईट विचार आहेत. सरकारला आता हेच धोरण अमलात आणायचे आहे, अशी टीका खरगे यांनी केल्यानंतर राज्यसभेत पुन्हा गदारोळ झाला. सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेत सभापतींना हा शब्द कामकाजातून वगळण्याची विनंती केली. सभापती राधाकृष्णन यांनी हा शब्द वगळण्याचे निर्देश दिल्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले.
‘वन नेशन वन इलेक्शन’ पुढे ढकलले!
‘वन नेशन वन इलेक्शन’च्या विधेयकासंदर्भात नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी)चा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामुळे या विधेयकाची मंजुरी लांबणीवर पडली आहे.
देशाला या प्रश्नांची उत्तरे द्या!
- लाठीमार कोणी केला, अश्रुधुराचे गोळे कोणी सोडले, पेलेट गनच्या वापराचा आदेश कोणी दिला?
- साध्या वेषात मोर्चात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करणारे कोण होते?
- दिल्ली पोलीस कोणाच्या अखत्यारीत येतात?
- सीआरपीए आणि आरएफ कोणाच्या आदेशावर काम करते?
- संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार कोण होता?
शहांना खेचून बाहेर काढू!
जे घडले त्याला अमित शहा सर्वाधिक जबाबदार आहेत, पण ते आता कुठेच दिसत नाहीत. एरवी प्रत्येक छोट्या विषयावर बोलतात. आता सभागृहात फिरकतही नाहीत. बंद खोलीत बसून ते आमचे भाषण ऐकत असतील, पण ते जास्त दिवस लपू शकणार नाहीत. आम्ही एक दिवस त्यांना खेचून बाहेर काढू, असे खरगेंनी ठणकावले. या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. त्यावर, ‘जनता त्यांना बाहेर काढेल असे मला म्हणायचे होते’, असा खुलासा खरगे यांनी केला.




























































