सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; एसटी-ट्रकच्या धडकेत चालक व महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू, 10 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर – पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेळगी पुलाच्या वर आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एसटीचे चालक आणि एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 10 प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी 31 जुलै 2026 रोजी पहाटे 4 वाजून 45 वाजण्याच्या सुमारास एसटी महामंडळाची ‘हिरकणी’ बस पुणे-हैदराबाद महामार्गावरून जात असताना शेळगी पुलावर तिची एका ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात एसटी बसचे चालक दादाराव बनसोडे (43) आणि नागुबाई राम रेल्वे (48) महिला प्रवशाचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या 6 ते 7 प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.