
कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरून कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. कावेरी जल नियमन समितीने (CWRC) तमिळनाडूला पुढील १५ दिवसांसाठी दररोज ३,५०० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर कर्नाटकातील मंड्या आणि म्हैसूर भागात शेतकरी आणि कन्नड संघटनांनी तीव्र आंदोलने सुरू केली आहेत.
या आंदोलनाचा मोठा फटका तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते जोसेफ विजय यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जन नायकन’ या चित्रपटाला बसला आहे. गुरुवारी, मंड्या येथील गुरुश्री चित्रपटगृहात सुरू असलेला या चित्रपटाचा शो आंदोलकांनी मध्यंतरातच बंद पाडला. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
चित्रपटाचे शोज रद्द
विजया सेना आणि इतर कन्नड समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर्स फाडले आणि तमिळनाडूला पाणी देण्याच्या निर्णयाविरुद्ध घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या वाढत्या दबावानंतर आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, चित्रपटगृह प्रशासनाने चित्रपटाचे पुढील सर्व शोज रद्द करण्याचा निर्णय घेतला.

























































