
रिझर्व्ह बँकेने बँकांना मोठय़ा रकमेच्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्यास मुभा दिली. अशा ठेवींवर बँका ठेवींच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या तरलता गरजेनुसार वेगवेगळे व्याजदर ठरवू शकतील. मोठय़ा ठेवींवरील वेगवेगळ्या व्याजदरांबाबतचे हे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
नव्या नियमानुसार, प्रत्येक बँकेला प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या संकेतस्थळावर विविध मुदतींच्या मोठय़ा ठेवींवरील (बल्क डिपॉझिट) व्याजदर जाहीर करावे लागतील. एकदा प्रसिद्ध केलेले व्याजदर त्या दिवसासाठी कायम राहतील आणि दिवसादरम्यान त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. दीर्घकाळ बँकेत राहण्याची शक्यता असलेल्या ठेवींना आणि लवकर परत जाण्याची शक्यता असलेल्या ठेवींना वेगवेगळे व्याजदर देणे बँकांना शक्य होणार आहे. दररोज अद्ययावत व्याजदर उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना कोणत्या बँकेत कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळणार आहे, याची स्पष्ट माहिती मिळेल.




























































