रमेश म्हात्रेचा कारागृहातील मुक्काम वाढला, तपास पूर्ण होईपर्यंत जामीन नाहीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉक्टर मारहाणीचा तपास पूर्ण होईपर्यंत शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामिनावरील स्थगिती उठवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत म्हात्रेचा मुक्काम कारागृहात असणार आहे.

माझा जामीन रद्द नसून त्याला स्थगिती देण्यात आली आहे. जामिनावेळी आरोपीच्या गुन्हेगारी भूतकाळाचा विचार केला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

जामीन हा माझा अधिकार आहे, असा दावा म्हात्रेकडून करण्यात आला. हा दावा हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला.

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आम्हाला माहीत आहे. पारदर्शक तपासासाठी आरोपीला जामीन न देणे व्यवहार्य आहे. डॉक्टर मारहाणीचा तपास अजून संपलेला नाही. ४ ऑगस्टला आरोपींची ओळखपरेड आहे. दहाजणांचे जबाब अजून नोंदवायचे आहेत. अशा परिस्थितीत म्हात्रेची जामिनावर सुटका करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. साक्षीदार, पीडितांना धमकी डॉक्टर मारहाणातील पीडित व साक्षीदारांना धमक्या येत आहेत. म्हात्रेची कामगिरी उल्लेखनीय नाही. तेव्हा त्याची जामिनावर सुटका करू नये, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

तूर्त तरी जामीन नकोच आरोपीला कारागृहात खितपत ठेवणे योग्य नसेल तरी म्हात्रेला तूर्त जामीन द्यायला नको. कारण तपास अजून अपूर्ण आहे, असे अॅड. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.