
“आम्ही लहान असताना आई-वडील सांगायचे, रात्री झोपताना डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर तेल चोपड चोपड चोपडले, पण बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो आणि हे म्हणे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री. आपण काय बोलतोय, जग कुठे चाललेय… उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दगडावरील फ्रिंगरप्रिट आधारशी लिंक करणार आहेत. कसे? मला चंद्रकांत पाटील यांच्या मेदूवरील फिंगरप्रिंट बघायचेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावे म्हणून या माणसाला शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला पाठवले, तिथेही काही झाले नाही. आता असे शिक्षणमंत्री म्हटल्यावर जेन झींचा पारा चढणारच. ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवली आहेत”, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषा योग्य नव्हती, मान्य आहे पण पंतप्रधानांनी हीच गोष्ट त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही सांगावी. त्यांच्या ट्रोल टीमने जे पेरलं तेच त्यांच्या अंगावर आलं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तुमच्या आईला बोलल्यावर तुम्हाला जसं वाईट वाटलं, तशी इतरांनाही आई असते. तुम्ही म्हणता मुलांना माफ केलं, इतक्या वर्षात तुमच्या पक्षाने जे केले त्याची माफी कोण मागणार? लाठी चालवली त्याचा आदेश देणारे माफी कधी मागणार? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
जंतर मंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो – मोदी
नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण या आंदोलनाला प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. सगळेच काही विद्यार्थी नव्हते. जे विद्यार्थी दशेतून बाहेर आले आहे ते तरुण, तरुणी होते. ते रस्त्यावर आले याचे कारण सभोवतालचे वातावरण आहे. सगळे तरुण एकवटले आणि रौद्र स्वरुप धारण केले. मला फुटपाथवरून चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेले असते, माझ्या लहान मुलांना खेळायला मैदान नाही, शिक्षण झाले पण नोकऱ्या मिळत नाहीत, सगळ्या कंपन्या खासगी लोकांना दिल्या जाताहेत, एकाच उद्योगपतीवर मेहेरबानी सुरू आहे. त्यालाच जंगल, जागा दिल्या आहेत… आमदार-खासदार फोडले जात आहेत. इतक्या वर्षांत साचलेले बाहेर आले आणि या सगळ्या गोष्टींचा उद्रेक बाहेर आला, तो अजून येणार. हा विषय कुणाला तरी सत्तेवरून खाली खेचणे आणि सत्तेवर आणणे एवढ्यापुरता नाही, तर देशाचा, तरुणांच्या भविष्याचा विषय आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

























































