
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी हिंदुस्थानच्या बॉक्सर्सची सुवर्ण सत्ता पाहायला मिळाली. बॉक्सिंगमध्ये प्रीती पवारने दिवसाची सुवर्णमय सुरुवात करून दिली. प्रीतीनंतर जास्मिन बॉक्सिंगच्या रिंगणात उतरली. जास्मिनची सुरुवात चांगली झाली नसली तरी अंतिम क्षणांत तिने जोरदार ठोसे मारत फायनल जिंकली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. साक्षी चौधरीनेही धडाकेबाज कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रिया घंघासने तर प्रतिस्पर्धीला दमवत सहजपणे सुवर्ण पदक पटकावले. अरुंधती चौधरीने तिसरी फेरी गाजवत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. पुरुषांमध्ये सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सोनेरी झळाळी दिली.
राणाने रचला इतिहास
पॅरा अॅथलेटिक्सच्या पुरुष गोळाफेक प्रकारात हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकवून दिले ते सोनम राणाने. सोनम राणाने 13.40 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह इतिहास रचला आणि भारताला या प्रकारात पहिलेच सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने पहिल्याच प्रयत्नात 13.38 मीटर गोळा फेकून आघाडी घेतली होती.



























































