ई २० इंधनाविरोधात मंगळवारी पंतप्रधानांच्या घरावर मोर्चा, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आप आदमी पक्षाने (आप) ई २० पेट्रोलविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. पेट्रोल पंपांवर ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचाही पर्याय हवा, ई २० पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असल्यामुळे पेट्रोलची किंमत ८४ रुपये प्रति लिटरपेक्षा कमी असावी, अशा तीन महत्त्वाच्या मागण्या ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केल्या आहेत. ई २० इंधनाच्या विरोधात ४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.

ई२० पेट्रोलच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, इथेनॉल फायदेशीर नसेल तर ते नागरिकांवर का लादले जात आहे? इथेनॉलमुळे लोकांना त्रास होत आहे. ते पेट्रोलपेक्षा महाग आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही कोणता फायदा होत नाही. परकीय चलनाचीदेखील बचत होत नाही. इथेनॉल बनवणाऱ्या कारखान्यांच्या जवळपासचे भूजल प्रदूषित होते. सरकारने ई २० इंधनामुळे वाहनांचे कोणतेच नुकसान होत नाही, असा दावा एका अहवालाच्या आधारे केला होता. तो अहवाल मोदी सरकारने सार्वजनिक करावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केला.

वाहनचालकांनी मांडल्या समस्या
‘आप’ने आयोजित केलेल्या नॅशनल टाऊनहॉलमध्ये विविध राज्यांमधून वाहन तज्ज्ञ आणि नागरिक सहभागी झाले होते. ई २० इंधनामुळे वाहनात निर्माण झालेल्या समस्या अनेक नागरिकांनी यावेळी सांगितल्या.