
केंद्र सरकारकडून 4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साखर साठय़ावर बंदी घालण्यात आली असून 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू केले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाजारातील कृत्रिम टंचाई तसेच साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत नवीन आदेश जारी केले असून त्यानुसार देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही साखर व्यापाऱ्याला अथवा डीलरला एका वेळी 4 हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही. याशिवाय व्यापाऱ्यांना मिळालेला साखरेचा साठा 30 दिवसांच्या आत बाजारात विक्री करणे बंधनकारक करण्यात आले असून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखर गोदामात साठवून ठेवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक
व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील साखरेच्या साठय़ाची संपूर्ण माहिती सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नियमितपणे अपडेट करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करून 3 ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली आहे.



























































