
आधी आमचे पुनर्वसन करा आणि त्यानंतरच आमची इमारत तोडा असा टाहो, दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारतीमधील रहिवाशांनी आज फोडला. त्यामुळे इमारत तोडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला पुन्हा माघारी फिरावे लागले. नारपोली गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट या इमारतीची बी विंग चार दिवसांपूर्वी कोसळल्यानंतर पालिकेचे पथक आज उरलेली ए विंग तोडण्यासाठी आले होते. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला. या इमारत दुर्घटनेमध्ये दहा रहिवाशांचा मृत्यू झाला आहे.
कोहिनूर अपार्टमेंट या इमारतीमधील बी विंगचा संपूर्ण भाग कोसळून दुर्घटना झाल्यानंतर पालिकेकडून या इमारतीचा उर्वरित ए विंगचा भागही पाडण्यात येणार होता. हे पाडकाम करण्यासाठी पालिकेचे पथक आज घटनास्थळी दाखल झाले. पोकलेन आणि अन्य सामग्रीसह आलेले हे पथक पाहून इमारतीमधील रहिवाशांनी कारवाईस विरोध केला. आधी आमचे पुनर्वसन करा आणि मगच इमारत पाडा, असा टाहो या रहिवाशांनी फोडला. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर पालिकेच्या पथकाला कारवाई थांबवावी लागली. दरम्यान नागरिकांच्या विरोधानंतर कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली असून उद्या पुन्हा नागरिकांची चर्चा करून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी दिली आहे.
- पालिकेने ही कारवाई करण्याआधी आम्हाला या मालमत्तेसंदर्भात पंचनामा करून द्यावा, तसेच संबंधित बिल्डरने आम्हाला पुन्हा इमारत उभी करून द्यावी, याबाबत ठोस आश्वासन द्यावे, त्यानंतरच उर्वरित बांधकाम पाडावे, अशी मागणीही यावेळी रहिवाशांनी केली.
- दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या इमारतीलासुद्धा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही इमारतसुद्धा तत्काळ रिकामी करून स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि नंतर दुरुस्ती करावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत.
- याप्रकरणी पालिका व पोलीस प्रशासनांना कुणालाही पाठीशी न घालता कारवाई करावी. दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी असून ती पालिकेने पूर्ण करावी, अशी मागणी
स्थानिक नगरसेवक यशवंत टावरे यांनी केली आहे.
केअर टेकरला अटक
कोहिनूर इमारत दुर्घटनाप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी इमारतीचा केअर टेकर अमृतलाल निशाद याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी इमारतीचा मालक बिलाल अहमद अबूबकर खान व दुरुस्तीचे काम करणारा कंत्राटदार अशोक, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केअर टेकर अमृतलाल हा मालक बिलाल खान याच्या फ्लॅट्सचे भाडे वसुलीचे काम करत होता.


























































