
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून पुढल्या आठवड्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, नारी शक्ती विधेयक सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधानांवर अत्यंत आक्रमक शब्दात निशाणा साधला. नारी शक्तीचं विधेयक आणण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी जंतरमंतरवर ज्या लहान मुलींवर पोलिसांनी अत्याचार केले, त्या नारी शक्तीची माफी मागायला हवी, असे संजय राऊत म्हणाले. फक्त कागदावर नारी शक्ती आणून चालत नाही. तुम्ही मुलींना मारायचे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या द्यायच्या, हे नारी शक्तीच्या सन्मानाचे चित्र नसून या अत्याचार पर्वाचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
संसदेत विधेयक आधीच मंजूर, मग नविन विधेयक कोणासाठी?
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना नारी शक्ती विधेयकावर भाष्य केलं. ते म्हणाले की, संसदेत नारी शक्तीसंदर्भातील विधेयक आधीच मंजूर झालेले असताना आता कोणत्या नवीन नारी शक्तीचे विधेयक आणत आहात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर बोलताना ते म्हणाले की, हे विधेयक संसदेत निश्चितपणे पडेल. आधी त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याच्या प्रयत्नात आहेत आणि पुढे समाजवादी पार्टीलाही फोडतील. द्रमुकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, मतदारसंघ पुनर्रचनेला त्यांचा कडाडून विरोध आहे आणि तो कायम राहील, त्यामुळे हे बिल किमान 50 मतांनी पडेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.
विरोधी पक्षांच्या भूमिकेवर बोलताना राऊत म्हणाले की, काँग्रेससह इतर सर्व प्रमुख पक्षांनी या विधेयकाविरोधात व्हीप जारी केला आहे. ‘मग काय हीच माकडं शहाणी आहेत का? ती माकडं आहेत आणि आम्ही माणसं आहोत, हाच राजकारणातला फरक आहे. माकडांना कितीही उड्या मारू दे, विरोधी पक्षांची उत्क्रांती झालेली आहे’, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
कुंभमेळा हा धार्मिक नसून ठेकेदारांचा मेळा
नाशिकच्या कुंभमेळ्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकच्या कुंभमेळ्याची सगळी ठेकेदारी गुजरातकडे जाते आणि लहान कामे आपल्याला देतात. या क्षणी गुजराच्या वेगवेगळ्या कंपन्यांना गिरीश महाजनांच्या माध्यमातून 56 हजार कोटींची कामे आताच गेलेली आहेत . कुंभमेळा हा धार्मिक नसून ठेकेदारांचा मेळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.




























































