देवरूख महावितरणचे कर्मचारी रविंद्र घाणेकर यांचा ऑनड्युटी ह्रदयविकाराने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयातील यंत्रचालक (आँपरेटर) रविंद्र रघुनाथ घाणेकर (47) यांचे आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रविंद्र घाणेकर यांच्या अकाली निधनाने महावितरण वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र घाणेकर हे देवरूख येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात गेले दिड वर्षे यंत्रचालक (आँपरेटर) म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ते ड्युटीवर होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते ड्युटीवर असताना अचानक त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. कर्मचाऱ्यांनी त्यांना लागलीच देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डाँक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रविंद्र घाणेकर यांच्या निधनाची बातमी समजताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.

रविंद्र घाणेकर हे मूळचे रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावचे रहिवाशी असून गेली 16 वर्षे ते शासकीय सेवेत आहेत. गेली साडेतीन वर्षे साडवली येथील महावितरण कार्यालयात कार्यरत होते. यानंतर ते गेली दिड वर्षे ते देवरूखातील महावितरण उपकेंद्रात कार्यरत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर होते. याचवेळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाठीत दुखायला लागले. यानंतर काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने एक शांत, प्रेमळ व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी गमावल्याची भावना महावितरण वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. रविंद्र घाणेकर यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.