
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे आयोजित एका रॅलीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार टीका केली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजपा आणि आरएसएसचे कोणतेही योगदान नसून ते केवळ पळपुटे आहेत आणि काँग्रेसचे नेतेच खरे देशभक्त आहेत, असा घणाघात त्यांनी केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रामलीला मैदानावर जनतेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘चले जाव’ आंदोलनाची आठवण करून दिली. हा एक पवित्र दिवस असून या आंदोलनाने देशवासियांना एकत्र केले आणि ब्रिटिशांना देशाबाहेर हाकलून लावले, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात आरएसएस किंवा भाजपाच्या कोणत्याही नेत्याने देशासाठी तुरुंगवास भोगलेला नाही. जर कोणी गेलाच असेल, तर ते मूळचे काँग्रेसचेच लोक होते जे नंतर तिकडे गेले. खरा देशभक्त पक्ष काँग्रेसच असून, ज्यांचा इतिहास शून्य आहे तेच लोक आज आपल्याला देशभक्तीचे धडे देत आहेत, असा सणसणीत टोला खरगे यांनी लगावला.
धर्माच्या नावाखाली भाजपा आणि आरएसएसचे लोक लूट करत असल्याचा गंभीर आरोपही खरगे यांनी यावेळी केला. केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम किंवा अयोध्येतील राम मंदिर असो, सगळीकडे भ्रष्टाचाराचे प्रकार घडत आहेत. मात्र, जेव्हा आपण संसदेत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भाजपाचे खासदार जाणीवपूर्वक गोंधळ घालतात आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले.




























































