
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करतानाच पुढच्या आंदोलनात सरकारचा माज उतरवणार असल्याचा थेट इशारा मराठा आंदोलन व मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा शनिवारपासून सुरू झाला. धाराशिव जिल्ह्यातील खेड येथे मराठा बांधव आणि ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी मराठा बांधवांना जागे राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे नव्याने साकारण्यात आलेल्या शिल्पाचे उद्घाटन शनिवारी दुपारी म्हणून जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घाणाघाती टीका केली. सरकार मराठ्यांच्या मुलांचे वाटोळे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठा प्रमाणपत्रांबाबत बावनकुळे यांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरून पत्र दिल्याचा आरोप करत जरांगे यांनी बावनकुळेंवर टीका केली. जरांगे पाटील यांनी भाजपचे जे आमदार आरक्षणाच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनात भूमिका घेत आहेत, त्यांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहनही केले.
गरिबांचं कल्याण करायचं असेल तर कोणी यामध्ये ढवळाढवळ करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपण टीका केलेली नाही. प्रमाणपत्र रद्द का करताय? हा माझा महत्त्वाचा प्रश्न घेऊन मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलो आहे, असे ते म्हणाले. सर्व समाजाने गुण्यागोविंदाने राहू नये, अशी सरकारची इच्छा दिसत आहे. सरकार समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.पूर्वीच्या ओरिजनल नोंदी असताना त्या रद्द कशा होतात? सरकारला ५८ लाख नोंदी द्यायच्या नाहीत. मराठ्यांनी वेळीच जागे झाले पाहिजे. राजकारण बाजूला ठेवा. मराठ्यांनो आपल्या मुलाबाळाचे कल्याण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी सोलापुरात बोलताना केले आहे.
उघड उघड सरकारकडून अन्याय करण्यात आला आहे. वेळीच आपण खडबडून जागे झाले पाहिजे. जर आपण जागे होणार नसाल तर आपल्यात मराठ्याचं रक्तच खवळत नाही, असाच समज होईल, असेही जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
सरकारला मोडी लिपीतील अभ्यासक सापडत नाहीत? ही मोठी शोकांतिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे बावनकुळे यांच्या माध्यमातून माझ्या मुळावर का उठलेत? हेच समजायला मार्ग नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. ओबीसीचे प्रमाणपत्र रद्द करा? असे मराठ्याच्या कधीच तोंडी आलेले नाही. मात्र मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांचे सरकार नुकसान करत आहे, हे मात्र आता लपून राहिलेले नाही. मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून फूट पाडण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांना बदनाम करत आहेत की काय? असा प्रश्नही जरांगे पाटलांनी उपस्थित केला. सरकारने आरक्षणासंदर्भातला एक नवा डाव आखला आहे. आणि तो अत्यंत भयानक असल्याचेही ते म्हणाले. शिंदे आणि भाजपकडून आपल्याला वारंवार फोन येत आहेत,परंतु आपण कोणाचेही फोन घेतलेले नाहीत. रॅलीवर हल्ला करायचा आणि आपल्याला अटक करण्याचा सरकारचा डाव सुरू असल्याचा घाणाघाती आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकार ईडीची भीती इतरांना दाखवत असेल, परंतु आपल्याकडे ईडीला काहीही मिळणार नाही. आपल्याला अटक करायला कोण येतं तेच दाखवतो. मराठे काय असतात ते त्यावेळी दिसून येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
बहुमताने सत्तेत आलेलो आहोत, आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असा सरकारला समज झाला आहे. मराठ्यांनी त्यांना निवडून दिले आहे. याची जाणीव त्यांना नाही. धनगर समाज, मराठा समाज, दलित समाज तसेच शेतकऱ्याला सरकारने फसवले. सत्तेचा माज चांगला नाही. २९ ऑगस्टला कोण कोणाचा माज उतरतोय हे आपण दाखवून देणार असल्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.
पक्ष गेले उडत, अन्याय करून घेण्याची मराठ्यांची अवलाद नाही. मराठ्यात गैरसमज पसरून फडणवीस फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. फडणवीस काहीही करू शकतात. त्यांनी सर्व डाव टाकून पाहिले आहेत. मात्र जरांगे पाटील झुकलेला नाही. जरांगे काहीही करू शकतो, मराठे काही पण करू शकतात हे २९ ऑगस्टला दिसून येईल, असे जरांगे पाटील म्हणाले.





























































