मुद्दा – पागोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रद्धा मोरे

खरं सांगायचं तर आपल्या बोलण्यातून, रोजच्या वापरातून बरेच अर्थपूर्ण आणि पुढील परिस्थितीचा धोका दर्शवणारे शब्द विस्मरणात चालले आहेत. हल्लीच्या पिढीला ‘पागोळी’ हा शब्द ऐकल्यावर तसा नवीनच वाटेल; कारण विज्ञान-तंत्रज्ञान जसजसे पुढे जात गेले तसतशी माणसाची विचारसरणी मात्र खुंटतच गेली असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

‘पागोळी’ हा खरंतर अतिशय सुंदर आणि निसर्गाशी जोडलेला शब्द आहे, जो आता हळूहळू विस्मरणात चालला आहे. याला काही भागात ‘ओलती’ किंवा ‘ओरी’ असेही म्हटले जाते. आताच्या पिढीला जरी हा शब्द ज्ञात नसला तरी ‘कोकणात पावसाचा प्रत्येक थेंब म्हणजे पागोळी’ आणि त्या प्रत्येक पागोळीची किंमत त्या काळच्या माणसांना माहीत होती. पाऊस पडला की ते पाणी जमिनीत मुरायचं, विहिरी भरायच्या, ओढे वाहायचे आणि गाव पाण्याने समृद्ध व्हायचं. म्हणजेच पुढचं भवितव्य सुखरूप व्हायचं; पण हळूहळू मानवी प्रजाती बदलल्या. जिकडेतिकडे सिमेंटचे जंगल उभे राहिले आणि झाडे कमी झाली. थोडक्यात, आपल्या हव्यासू वृत्ती व वाढत्या अवाजवी अपेक्षांमुळे झाडांना कात्री लावली गेली. परिणामी, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी रस्त्याने वाहू लागले. प्रसंगी रस्त्यांची डबकी  झाली.

पावसामध्ये प्रत्येकाच्या घराच्या छपरावरून अंगणात पडणारी पागोळी न्याहाळणं ही आबालवृद्धांच्या मनाला कायम आनंद देणारी गोष्ट राहिली आहे; परंतु कवितेचं सौंदर्य लाभलेल्या आणि मानवी मनाला लुभावणाऱ्या याच पागोळीवर मानवी आयुष्याचं भवितव्य सांभाळण्याची जबाबदारी येईल असा कोणी कधी विचारही केला नव्हता. पण मनुष्याच्या कर्माने ती वेळ आता आली आहे. पागोळी केवळ घरांच्या किंवा इमारतींच्या छपरावरूनच खाली जमिनीवर पडते असं नाही. पावसाळ्यात हरएक पर्वत, डोंगरावरून वाहणारे आणि खाली कोसळणारे पाण्याचे प्रवाह या विविध प्रकारच्या पागोळ्याच आहेत.

पागोळीचे तसे वेगवेगळे संदर्भ आहेत. पहिला संदर्भ म्हणजे-छतावरून किंवा कौलावरून खाली येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या अखंड धारेला (किंवा थेंबांना) पागोळी म्हणतात. लहान मुलांसाठी पावसाळ्यात या पागोळ्यांमधून खेळणे हा एक खूप आनंदाचा भाग असतो. तर अतिथंड प्रदेशात किंवा हिवाळ्यात छतावरून वितळणारे पाणी खाली येताना गोठून बर्फाच्या सुयांसारखे किंवा लांब तुकडय़ांसारखे (Icicles) लटकतात त्याला बर्फाच्या पागोळीचा संदर्भ जोडला जातो. तिसरा संदर्भ म्हणजे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी किंवा साठवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पारंपरिक विहिरी किंवा खड्डय़ांना ’पागोळी विहीर’ किंवा ’पागोळी पद्धत’ म्हटले जाते. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. आणि चौथा संदर्भ म्हणजे, अनेक मराठी कविता आणि साहित्यात पागोळीचा उल्लेख निसर्गाचे सौंदर्य आणि मानवी भावना व्यक्त करण्यासाठी व आठवणींचा ठेवा जपण्यासाठी केला जातो.

पूर्वीच्या कौलारू घरांच्या काळात हा शब्द सर्रास वापरला जायचा, परंतु आता सिमेंटच्या इमारती आणि ‘पाइपलाइन’ आल्यामुळे हा शब्द रोजच्या वापरातून जवळपास हद्दपार झाला आहे.आधुनिक जीवनशैलीत या शब्दाचे अस्तित्व मागे पडत असले तरी भाषेचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी हे शब्द जपणे गरजेचे आहे.

आजही पाऊस तितकाच पडतो; पण आपल्याला पाणी मात्र कमी पडते. म्हणून उद्याची पाणीटंचाई थांबवायची असेल तर प्रत्येक पागोळी वाचवायला हवी.