
मोदी सरकारच्या सोशल मीडिया सेन्सॉरशिपवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कडाडून टीकास्त्र सोडले. या वर्षी मार्च ते जुलै या कालावधीत मोदी सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना तब्बल 1.95 लाख अकाऊंट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिल्याचा आरोप खरगे यांनी केला. हा प्रकार म्हणजे हिंदुस्थानी नागरिकांच्या लोकशाही अधिकारांवर हल्ला असल्याची टीका खरगे यांनी केली आहे.
खरगे यांनी ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मोदी सरकारने प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या लोकशाही अधिकारावर आक्रमण केले आहे. आमच्या तरुणांवर करण्यात आलेला लाठीहल्ला आणि पॅलेट गनच्या वापराएवढीच मोदी सरकारची सोशल मीडिया सेन्सॉरशिप निंदनीय आहे, असे खरगे म्हणाले.
प्रत्येक 68 सेकंदांनी एक खाते ब्लॉक
फक्त पाच महिन्यांमध्ये मोदी सरकारने 1.95 लाख खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ प्रत्येक 68 सेकंदांनी एक खाते ब्लॉक करण्यात येत आहे. आपल्या भवितव्यासाठी आणि परीक्षांमधील गैरप्रकाराविरोधात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आणि तरुणांविरोधात हे आदेश आहेत. आंदोलनादरम्यान त्यांची हाडे मोडली जात असताना त्यांच्या समर्थनार्थ येणारी प्रत्येक पोस्ट आणि व्हिडीओ मोदी सरकार पद्धतशीरपणे हटवीत होते, अशी टीका खरगे यांनी केली.
























































