
हिंजवडी आयटी पार्कमध्ये सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेज 1 ते फेज 3 या अवघ्या दीड ते दोन कि.मी. प्रवासासाठी तब्बल दीड तासाचा अवधी लागतो. प्रचंड वाहतूककोंडी आणि खड्डे यामुळे रुग्णालयापर्यंत रुग्ण पोहोचू शकणार नाही, अशी दयनीय अवस्था असल्याची व्यथा परिसरातील आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली. तसेच विविध मागण्यांसाठी 6 सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याची आयटीयन्सनी घोषणा केली. आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे 20 कंपन्यांनी खराब रस्ते, प्रचंड वाहतूककोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या अभावामुळे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शनिवारी चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यानंतर हिंजवडी आयटी पार्कमधील आयटीयन्सनी आदित्य ठाकरे यांना मेसेज करून हिंजवडीतील विविध समस्यांबाबत आपण येथेही पाहणी दौरा करावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी दोनच दिवसांत हिंजवडी आयटी पार्क परिसराला भेट दिली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंजवडीतील मेट्रो स्टेशनचीही त्यांनी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. त्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत ग्रामपंचायत सदस्यांशीही त्यांनी परिसरात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत चर्चा केली. आयटीयन्स, सोसायटीधारक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. बैठकीत नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथामांडली. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये सुमारे चार ते पाच लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा प्राधान्याने मिळणे गरजेचे आहे. मात्र, येथील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यातच गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी असते. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे फुटपाथ कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्याने चालताना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागते, अशी व्यथा एका सोसायटीधारकाने मांडली. मुळशी धरणातून पाणी आणण्याचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे; मात्र काहीच निर्णय होत नाही, अशी व्यथाही नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली.
यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, महिला आघाडी संपर्क संघटक स्वाती ढमाले, युवासेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अविनाश बलकवडे, तालुकाप्रमुख सचिन खैरे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, जिल्हा उपप्रमुख रोमी संधू, कैलास नेवासकर उपस्थित होते.
हिंजवडी आयटी पार्कमधील समस्यांप्रकरणी गेल्या वर्षी येथील उद्योजक, संघटना, नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते; मात्र मागील वर्षभरात रस्ते, वाहतूककोंडीसह सर्व समस्या अद्यापि ‘जैसे थे’ असल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना सगळीकडे चांगली परिस्थिती असल्याचे वाटत असते, मात्र त्यांनी प्रत्यक्ष हिंजवडीत येऊन पाहणी करायला हवी.
हे सरकारचे अपयश
चाकण एमआयडीसीप्रमाणेच हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात रस्ते, वीज, पाणी, कचऱयाची गंभीर समस्या आहे. या भागात तीन ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमआरडीए अशा तीन यंत्रणा कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये समन्वय नसून, सावळागोंधळ आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटत नसतील तर हे सरकार आणि प्रशासनाचे अपयश आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
चार वर्षांत हिंजवडीत एकही नवीन कंपनी आली नाही
वाहतूककोंडीमुळे हिंजवडी फेज-3मधून फेज-1ला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. या भागात मूलभूत प्रश्नांमुळे उद्योजक हैराण असून, नवीन कंपन्या येत नाहीत. मागील तीन ते चार वर्षांत एकही नवीन कंपनी या परिसरात आली नाही. आहे त्याच कंपन्या बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्योगमंत्र्यांचे अन् डांबराचे ‘घट्ट नाते’!
चाकण एमआयडीसी परिसरात उद्योगमंत्री येणार म्हटले की, रस्त्यांची दुरुस्ती होते. मात्र दौरा संपताच परिस्थिती पूर्ववत होत असल्याची टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘उद्योगमंत्री आणि डांबराचे ‘घट्ट नाते’ आहे. ते आल्यावर डांबर टिकते की नाही, हाच खरा प्रश्न आहे. एका भेटीने काम होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन चाकण, हिंजवडीतील प्रलंबित प्रश्न सोडवले पाहिजेत,’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रश्न सोडवण्यापेक्षा पक्ष फोडण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष!
मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर सर्व यंत्रणांना एका रांगेत उभे करून आयटी पार्क, एमआयडीसी भागातील प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात. परंतु प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय पक्ष फोडण्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच ‘राज्य सरकारने उद्योगधंदे, नोकऱया वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे,’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


























































