शिक्षक खुर्चीवर बसतात, विद्यार्थी झाडू मारतात! हिंगोलीच्या ढेगस गावच्या शाळेचे विदारक चित्र, अभिजित दीपके यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘स्कूल ठिक करो’ अभियानात मंगळवारी आणखी एका सरकारी शाळेचे विदारक चित्र समोर आले. ढेगस येथील शाळेत चक्क चिमुकले विद्यार्थी वर्गात झाडू मारत असल्याचे पाहून अभिजित दीपके यांचा संताप अनावर झाला.

‘स्कूल ठिक करो’ या अभियानाअंतर्गत आज दीपके यांनी ढेगस येथील सरकारी शाळेची पाहणी केली. शाळेत विद्यार्थीच वर्गात झाडू मारत असल्याचे पाहून दीपके थक्क झाले. ‘तुम्हाला कोणी झाडू मारायला सांगितला’ असा प्रश्न दीपके यांनी विद्यार्थ्यांना विचारला. तेव्हा आपले बिंग फुटेल या भीतीने शिक्षकांनीच ‘विद्यार्थी त्यांच्या मनानेच झाडू मारतात’ असे कोडगे उत्तर दिले. त्यावर दीपके यांनी शिक्षकांचे कान उपटले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिजित दीपके यांनी त्यांना यापुढे वर्गात झाडू मारायचा नाही, असे स्पष्ट बजावले. तुम्ही फक्त शाळेत शिकायला यायचे. कुणी झाडू मारायला सांगितले तर मला फोन करा, असेही दीपके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेत काय काय पाहिजे दीपके यांनी विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृह, वहय़ा, पुस्तके, पेन, गणवेश अशी मागणी केली.

लिंबाळा मक्ता येथे आंदोलन

लिंबाळा मक्ता येथील ग्रामस्थांनी शाळेला सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनात अभिजित दीपके यांच्यासह शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघाचे समन्वयक दिलीप घुगे सहभागी झाले होते.

दारुडा मुख्याध्यापक निलंबित

अभिजित दीपके यांनी लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली होती. यावेळी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक विनोद कटके हे दारू पिऊन शाळेत येत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दीपके यांनी प्रशासनाकडे कटके यांची तक्रार केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मुख्याध्यापक विनोद कटके यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश काढले. तर एका शिक्षकाची पंधरा दिवसांत नियुक्ती करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन वाघ आणि केंद्रप्रमुख गजानन बोरकर यांनी अभिजित दीपके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले. दीपके यांच्या पाहणीनंतर शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. आज दीपके यांनी संतुक पिंपरीसह सिद्धेश्वर, ब्राह्मणवाडा, मूर्तिजापूर, सावंगी येथील शाळांचीही पाहणी केली.