
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियानांतर्गत गडचिरोली जिह्यात शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला जिह्यातील पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीतील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. गडचिरोली जिह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतानाही या जिह्याची अवस्था दयनीय आहे. नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. सरकारकडून विकासाच्या मोठमोठय़ा घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमकपणे भूमिका घेत सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, नागपूर महानगर संपर्कप्रमुख सतीश हारडे, सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड, पवन गेडाम, दिलीप सुरपाम, उत्तम कापसे, शुभम सोरते, विलास ठोंबरे, नंदू कुमरे, पप्पू शेख, यांच्यासह जिह्यातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






























































