८६ हजार कोटींच्या थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे आझाद मैदानात आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी तातडीने संयुक्त बैठक बोलवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ८६,६६२ कोटी रुपयांच्या थकीत बिलांसाठी आज कंत्राटदारांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात येत असून त्यात राज्यभरातून आलेले कंत्राटदार सहभागी झाले आहेत.

प्रलंबित बिलांच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटदार अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बिले थकल्यामुळे कंत्राटदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून बँकेचे हप्ते आणि व्याजाबरोबरच कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च भागवायचा कसा, अशा विवंचनेत ते पडले आहेत. त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत पैसे देण्याची मागणी केली होती, परंतु सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी आजपासून आझाद मैदानात ठिय्या मांडला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, संबंधित विभागांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसह यासंदर्भात संयुक्त बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी महासंघाने केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने कंत्राटदारांची थकीत बिले टप्प्याटप्प्याने आणि व्याजासह दिली जातील असे आश्वासन कंत्राटदार संघटनांना दिले असतानाही आज त्यातील काही संघटनांनी मिळून आंदोलन केल्याने कंत्राटदार संघटनांमध्ये मतभेद आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.