हिंदुस्थानने गोल शून्य बरोबरीत रोखून गाठली दुसरी फेरी; इंग्लंडचा विश्वचषकातील प्रवास संपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या महिला संघाने हॉकी विश्वचषकातील इंग्लंडचा प्रवास संपुष्टात आणला. ‘ड’ गटातील चुरशीचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला हिंदुस्थानने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान मात्र साखळी फेरीतच संपुष्टात आले. हिंदुस्थानने स्पर्धेतील आपली अपराजित वाटचाल कायम ठेवत उपांत्य फेरीच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत.

दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र हिंदुस्थानच्या बचावफळीने आणि गोलरक्षकाने इंग्लंडचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अंतिम शिट्टी वाजली तेव्हा सामन्याचा निकाल ०-० असाच राहिला.

पहिल्या सत्रात हिंदुस्थानचा आक्रमक खेळ

पहिल्याच क्वार्टरपासून हिंदुस्थानी खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. इशिकाने इंग्लंडच्या बचावाला भेदत घेतलेला फटका गोलमध्ये रूपांतरित होण्यापासून इंग्लिश गोलरक्षकाने रोखला. यानंतर हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. नवनीतने घेतलेला फटका गोलमध्ये गेला; मात्र हा गोल अमान्य ठरवण्यात आला. हिंदुस्थानला आणखी दोन संधी मिळाल्या, पण त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात इंग्लंडला एक ग्रीन आणि एक यलो कार्ड मिळाले. सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस इंग्लंडला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती; मात्र ज्योतीने भक्कम बचाव करत ही संधी हाणून पाडली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंग्लंडचा जोर

उत्तरार्धात इंग्लंडने आक्रमक खेळाची धार वाढवली. हिंदुस्थानपेक्षा इंग्लंडचे खेळाडू या सत्रात अधिक प्रभावी दिसले. इंग्लंडने सलग पेनल्टी कॉर्नर मिळवत हिंदुस्थानी गोलपोस्टवर दबाव आणला. मात्र, हिंदुस्थानी बचावफळी आणि गोलरक्षकाने इंग्लंडला एकही गोल करू दिला नाही.

हिंदुस्थानची अपराजित वाटचाल

हिंदुस्थानने स्पर्धेच्या सुरुवातीला जगातील चौथ्या क्रमांकाच्या आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिंदुस्थानचे सहा गोल सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी केले.