
मुंबईच्या कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. एका क्रेनच्या साहाय्याने जेसीबी उचलत असताना ती अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले. या अपघातात खाली उभे असणारे आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील कुरेशी नगरमध्ये एमएमआरडीएचे काम सुरू असताना हा अपघात घडला. शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास क्रेनद्वारे जेसीबी मशीन हलवण्याचे काम सुरू होते. यादरम्यान अचानक क्रेन आणि जेसीबी मशीन एका घरावर कोसळली. सुदैवाने, क्रेनने मशीन हलवण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी तो परिसर पूर्णपणे रिकामा केला होता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, काहीजण या भागात हे सगळे मोबाईलवर शुट करत होते. दरम्यान क्रेनचा एक भाग दोन घरांवर आणि नंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडला. अपघातात एक कार आणि एका ऑटो-रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएच्या मालकीची ही क्रेन कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यानच्या मालगाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर आणि एकाच रेल्वे रुळावर पडली. ही लाईन मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी असल्याने रेल्वेच्या नियमित प्रवासी प्रवासावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सध्या घटनास्थळावरील ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, या संपूर्ण दुर्घटनेसाठी एमएमआरडीए जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.




























































