
मॉर्डना आणि मेर्क यांनी विकसित केलेल्या वैयक्तिकृत एमआरएनए कॅन्सर लसीने मेलेनोमाच्या उच्च जोखमीच्या रुग्णांवरील उशिराच्या टप्प्यातील म्हणजेच लेट-स्टेज क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. ही लस मर्कच्या कीटूडा या इम्युनोथेरपी औषधासोबत देण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मेलेनोमा पुन्हा होण्याचा किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी ही वैयक्तिकृत ‘एमआरएनए’ लस विकसित करण्यात आली आहे. ही लस कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करून दुय्यम उद्दिष्ट असलेल्या मेलेनोमा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका कमी करेल.
या उपचाराने चाचणीतील मुख्य उद्दिष्ट साध्य करत कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी केला, तसेच दुय्यम उद्दिष्ट असलेल्या मेलेनोमा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका कमी करण्यासही यश मिळवले. या चाचणीचे सविस्तर निकाल आगामी वैद्यकीय परिषदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे.
संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक लसींपेक्षा वैयक्तिकृत कॅन्सर लस वेगळी असते. ती प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरनुसार स्वतंत्रपणे तयार केली जाते. ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे काढल्यानंतर त्यातील जनुकीय बदलांचे विश्लेषण केले जाते.
रोगप्रतिकारक यंत्रणेला शरीरात उरलेल्या कॅन्सर पेशी ओळखण्यास मदत होऊ शकते. कीटूडा हे मेलेनोमासाठी आधीपासूनच प्रस्थापित उपचार असल्याने हे निकाल महत्त्वाचे आहेत. विद्यमान इम्युनोथेरपीमध्ये वैयक्तिकृत कॅन्सर लस जोडल्याने उपचारांचे परिणाम आणखी सुधारू शकतात, हे या निष्कर्षांमुळे अधोरेखित झालं आहे.
कंपन्या या उपचाराबाबत नियामक संस्थांशी चर्चा करत आहेत. या उपचाराला ब्रेकथ्रू थेरेपी डेसिग्नेशन मिळाले असल्याने नियामक मंजुरी मिळाल्यास ते पुढील वर्षीच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, चाचणीचे संपूर्ण आणि सविस्तर आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. तसेच या उपचारामुळे रुग्णांचे एकूण आयुर्मान वाढते का, याचे निष्कर्ष अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, असे मॉर्डनाचे अध्यक्ष स्टीफन होग यांनी सांगितले.


























































