
पिंपरी-चिंचवड शहरात निगडी ते चाकण असा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असून, या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने (एनएचएआय) नाशिक फाटा ते खेड असा ३० किलोमीटर लांबीचा आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेला भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
शहराची गरज लक्षात घेऊन निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा ४५.२९५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा उर्वरित संपूर्ण भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. तसेच, हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी-चिंचवड आणि चाकण एमआयडीसी मेट्रोने जोडली जाणार आहे. या मार्गाचा तब्बल १२ हजार ९३७ कोटी २३ लाख रुपये खर्चाच्या सुधारित डीपीआरला महामेट्रोने तयार करून पालिकेकडे फेब्रुवारी २०२६ ला सादर केला आहे. त्या संदर्भात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादरीकरण केले.
मेट्रोच्या डीपीआरबाबत माहिती देताना महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, महामेट्रोने सुधारित डीपीआर पालिकेस सादर केला आहे. त्यावर लोकप्रतिनिधींसमोर २७जुलैला सादरीकरण करण्यात आले. सुधारित डीपीआर ४७.२९५ किलोमीटर अंतराचा आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहरात एकूण २८ आणि चाकण नगरपालिका हद्दीत एकूण ६ असे एकूण ३४ मेट्रो स्टेशन असणार आहेत. त्यात महापालिकेचा हिस्सा एकूण ३३० कोटी रुपयांचे असणार आहे. तर, नाशिक फाटा ते खेड या मार्गावर एनएचएआयकडून आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ७ हजार ८२७ कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली आहे त्यासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. त्या कामासाठी भोसरी येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
भोसरीयेथील उड्डाणपूल पाडण्यास महापौर रवि लांडगे यांचा विरोध आहे. पूल ठेवून पर्यायी बाबीचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र, पूल पाडण्यात येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल. सुधारित डीपीआरबाबत नगरसेवकांसमोर पुन्हा सादरीकरण केले जाणार आहे. त्यात, उपसूचनेनुसार डीपीआरमध्ये बदल केला जाईल, असे महापौर रवि लांडगे यांनी दावा केला आहे.
सुधारित ‘डीपीआर’ नुसार तपशील
पिंपरी-चिंचवडमध्ये स्टेशन-२८ चाकण नगरपालिका हद्दीतील स्टेशन – ६ एकूण स्टेशन-३४ अंतर-४७.२९५ कि.मी. मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) एकूण खर्च – १२ हजार ९३७ कोटी २३ लाख रुपये पिंपरी-चिंचवड पालिकेचा हिस्सा-३३० कोटी रुपये केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सा-प्रत्येकी १ हजार ७२१ कोटी ७१ लाख रुपये
नवा मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती येथून ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक वाकडपर्यंत जाईल. तेथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गावरील वाकड स्टेशनला मेट्रो बदलता येईल. येथून विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळी माता चौक, सेन्चुरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी से.क्र. १, भोसरी एमआयडीसी, तेल गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडीवरून चाकणपर्यंत.



























































