साखरेची दरवाढ ही नैसर्गिक नाही, तर नियोजनबद्ध कट; कारखानदार-व्यापाऱ्यांमध्ये संगनमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात साखरेचा साठा मुबलक असतानाही अचानक दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी उमटू लागली असतानाच, अचानक साखरेच्या दरात झालेली ही वाढ नैसर्गिक नसून, तो एक नियोजनबद्ध कट असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांनी केला आहे. या दरवाढीच्या आडून सुमारे २० ते २२ हजार कोटींचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त करत, यामध्ये कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजू शेट्टी म्हणाले, या वर्षीचे पीक पाणी पाहता देशात पुढील हंगामापर्यंत पुरेल इतके साखरेचे उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात दिवाळीपर्यंत पुरेल इतकी साखर शिल्लक आहे. तरीसुद्धा बाजारपेठेत साखरेच्या दराने अचानक उसळी घेणे हे संशयास्पद आहे. तसेच सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला असला, तरी ऑक्टोबर महिन्यापूर्वी परदेशातून देशात साखर येणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. याच संधीचा फायदा घेत साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, यामुळे सामान्य ग्राहक आणि ऊसउत्पादक शेतकरी अशा दोघांचीही लूट होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात रिकव्हरी चोरून तयार केलेली आणि रेकॉर्डवर नसलेली साखर हा कळीचा मुद्दा ठरत आहे. साखर कारखान्यांमध्ये उत्पादित झालेली; पण कागदोपत्री न दाखवलेली ही साखर थेट बाजारात आणली जात आहे. यामुळे काळा पैसा निर्माण होत असून, तो कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे. तसेच साखरेची वाहतूक करताना अनेकदा अधिकृत पावत्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीएसटीची चोरी होत असल्याचा संशयही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

एमएसपी वाढ शेतकऱ्यांच्या हितासाठी
साखरेच्या उत्पादनावर साखरेचे दर अवलंबून असतात. साखरेची एमएसपी वाढली पाहिजे, ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. केंद्र सरकारने १५ दिवसांत निर्णय घेतो, असे याआधी सांगितले होते, पण तो निर्णय काही घेतलेला दिसत नाही. त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसून येत असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले.

यंदा साखरेचा हंगाम कमी
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी देशात साखर हंगाम फार कमी चालला. साखर कारखाने ९० दिवससुद्धा चालले नसल्याचे सांगितले. जगात सर्वाधिक साखर पुरवठा ब्राझीलमधून होतो. पण अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे त्या देशाने जास्तीत जास्त इथेनॉलनिर्मितीचेच धोरण घेतले. त्यामुळे साखरेचे दर जरी वाढलेले असले, तरी आपल्या देशातील साखर कारखान्यांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना याचा फार कमी फायदा होणार आहे. कारण, आपल्याकडे साखरच शिल्लक नाही.