
अखंड हरिनाम सप्ताहात तब्बल पावणेतीन लाख भाविकांनी एकाच वेळी ‘व्यसनमुक्त भारत’ करण्याची शपथ घेत अनोखा विक्रम नोंदविला. अहिल्यानगरच्या धनगरवाडीत झालेल्या या शपथ सोहळ्याची ‘विनर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली.
‘सरला बेट’चे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख 75 हजार 115 भाविकांनी ‘आम्ही घडवू व्यसनमुक्त भारत’ची शपथ घेतली. संत योगिराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहात हा शपथ सोहळा पार पडला. या सोहळ्याची ‘विनर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली. ‘विनर्स’चे अध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी रामगिरी महाराज यांना याबाबतचे प्रमाणपत्र प्रदान केले. ‘मिस इंडिया’, तसेच ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अध्यक्षा डॉ. ईशा अग्रवाल यांनी रामगिरी महाराज यांचे अभिनंदन केले. यावेळी मधुमहाराज, ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या राजयोग एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फाऊंडेशनच्या ‘मेडिकल किंग’चे कार्यकारी सचिव आणि 10 कोटी ‘नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना’चे प्रमुख बी. के. डॉ. बनारसीलाल भाईजी, अहिल्यानगर सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. राजेश्वरी, उपसंचालिका बी. के. सुप्रभा, सोनई सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. उषा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील आदी उपस्थित होते.
याआधी पुण्यात विक्रम
यापूर्वी कोथरूड येथे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी 2023 रोजी एकाच वेळी 1,26,613 जणांनी ‘व्यसनमुक्त भारत’ची शपथ घेतली होती. धनगरवाडीतील शपथ सोहळ्याने हा विक्रम मोडला आहे.






























































