
तेलंगणातील सूर्यापेठ जिल्ह्यात बुधवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला. भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने समोर चाललेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने ५ महिलांसह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर किमान १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात कोदाड मंडळाजवळ पहाटे सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घडला. ही खासगी बस ४२ प्रवाशांना घेऊन हैदराबादहून आंध्र प्रदेशातील एलुरूच्या दिशेने जात होती. प्रवासात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.



























































