
मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात विद्यार्थ्याने वर्गात प्रश्न विचारल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याला मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेत तन्मय समाधान खंडागळे हा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राहुल जाधव असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक राहुल जाधव वर्गात शिकवत असताना तन्मय खंडागळे याने ‘दहा वेळा शून्य हा मोबाईल क्रमांक असू शकतो का?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर शिक्षक संतप्त झाले आणि त्यांनी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर तन्मयला मारहाण केल्याचा आरोप पालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. या मारहाणीत तन्मयच्या पाठीवर, चेहर्यावर, कानामागे तसेच डोक्यावर दुखापतीच्या खुणा असल्याचे पालकांनी तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेनंतर विद्यार्थ्याचे वडील समाधान रामराव खंडागळे यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्याने केवळ प्रश्न विचारल्यामुळे त्याला मारहाण झाली असेल, तर हा प्रकार गंभीर असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे. शाळा हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे ठिकाण असून तेथे विद्यार्थ्यांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणार्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मारहाणीमागील नेमके कारण, घटनेची परिस्थिती आणि संबंधित शिक्षकाची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडूनही या प्रकरणाची दखल घेतली जाते का? याकडे लक्ष लागले आहे.



























































