
हिंगोली शहरानजीकच्या खटकाळी बायपास भागातील रेल्वे उड्डाणपुलाखाली आज, शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. हिंगोली जिल्हा पोलीस दलात नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल विठ्ठलराव गंगलवाड (वय – 50, रा. मूळ जि. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गंगलवाड यांची दोन महिन्यांपूर्वीच परभणी येथून हिंगोली जिल्हा पोलीस दलात बदली झाली होती. सध्या ते जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात सेवा बजावत होते. शनिवारी सकाळी आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास ते हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आले.
दरम्यान, अकोल्याच्या दिशेने जाणारी रेल्वे खटकाळी पुलाजवळ आली असता, गंगलवाड यांनी अचानक धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या केली त्यावेळी गंगलवाड हे पोलीस गणवेशात होते.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
पोलीस उपनिरीक्षक गंगलवाड यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली शहर पोलिसांकडून सुरू आहे.


























































