मंगला एक्सप्रेसमध्ये 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; भुसावळहून तातडीने वैद्यकीय यंत्रणा सक्रिय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव – भुसावळ मार्गे धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन-एरणाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून केरळकडे प्रवास करणाऱ्या सुमारे ८३ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास झाल्याची घटना घडली. इटारसी स्थानक सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. घटनेची माहिती मिळताच भुसावळ रेल्वे विभागाच्या नियंत्रण कक्षाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा सक्रिय केली.

मंगला एक्स्प्रेस खंडवा स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच भुसावळहून वैद्यकीय पथक खांडवा येथे रवाना झाले होते. गाडी खंडवा स्थानकावर पोहोचताच त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून आवश्यक औषधे देण्यात आली. उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाल्याने मंगला एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. केरळमधील सुमारे ८३ विद्यार्थ्यांचा हा समूह मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. या विद्यार्थ्यांचे वय साधारण ८ ते १८ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. इटारसी स्थानक पार केल्यानंतर अचानक काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागली. सुरुवातीला मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सुमारे ३५ विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास झाल्याचे समोर आले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंगला एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच तेथे वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली होती.

खंडवा स्थानकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू राहिला. खंडवा ते भुसावळ दरम्यानही गाडीतच विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. , मंगला एक्स्प्रेस रात्री साडेअकराच्या सुमारास भुसावळ स्थानकावर पोहोचली. गाडी भुसावळला पोहोचताच डॉक्टर, परिचारिका, रेल्वे अधिकारी आणि रुग्णवाहिकांच्या ताफ्याने ट्रेनला घेराव घालत तातडीने उपचार सुरू केले. या आपत्कालीन वैद्यकीय तपासणीसाठी मंगला एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर तब्बल पाऊण तास (४५ मिनिटे) थांबवून ठेवण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना नेमका कोणत्या कारणामुळे हा त्रास झाला, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. प्रवासादरम्यान त्यांनी कोणते खाद्यपदार्थ सेवन केले होते आणि त्यातून हा त्रास झाला का, की अन्य काही कारणामुळे त्यांची प्रकृती बिघडली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.