
आदिवासी आश्रमशाळांमधील अनागोंदी आणि विद्यार्थी मृत्यू प्रकरण राज्यभर गाजत आहे. कळवणच्या विसापूर आश्रमशाळेत शुक्रवारी पहाटे दुसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करीत वडिलांसह नातलगांनी जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. दरम्यान, आश्रमशाळेच्या अधीक्षिकेसह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे.
कळवणजवळील विसापूर येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी विद्यार्थिनीला गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. प्राथमिक उपचारानंतर तिला आश्रमशाळेत आणण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता पुन्हा ताप येवून प्रपृती खालावल्याने कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रात्री अडीच वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
हलगर्जीपणाचा ठपका; चौकशीसाठी समिती
प्राथमिक चौकशीनुसार वसतिगृह अधिक्षिका स्मिता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी भगवान निकम, मुख्याध्यापक जिभाऊ पवार यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सखोल चौकशीसाठी प्रकल्प स्तरावर समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.
काथवडपाडा तालुक्यात विद्यार्थिनीची आत्महत्या
आश्रमशाळेत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काथवडपाडा येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा आश्रमशाळेत ही विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकत होती. हरसूल पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.






























































