
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 18 वर्षांपासून सुरू आहे. तरीही अद्याप तो पूर्ण झालेला नाही. एकामागोमाग एक डेडलाईन सरकारने जाहीर केल्या, पण आजही हा महामार्ग रखडलेलाच आहे. त्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उघड नाराजी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा उद्घाटनाला आपण येणार नाही, कारण मला माझीच लाज वाटतेय इतका उशीर झालाय, असे ते म्हणाले.
गोव्यातील पोरवोरिम येथील 5.15 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी उन्नत कॉरिडॉरचे नितीन गडकरी यांनी बुधवारी उद्घाटन केले. हा मुंबई-गोवा महामार्ग म्हणजेच एनएच-66 चा भाग आहे. याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल खंत आणि नाराजी व्यक्त केली. एखादा प्रकल्प इतका दीर्घकाळ अपूर्ण राहतो हे दुर्भाग्य म्हणावे लागेल, एखादी चूक झाली तर मान्य करायला हवी, पण त्याला आपण एकटेच जबाबदार नाही, असे ते म्हणाले.
भू-संपादन, कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणी जबाबदार
मुंबई-गोवा महामार्गाचे काम 93-94 टक्के पूर्ण झाल्याचा दावा राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून वारंवार केला जातो. 2016 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा होता. परंतु भू-संपादन आणि कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींमुळे या महामार्गाच्या कामाला विलंब झाल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली होती.
ऑक्टोबरमध्ये पाहणी करणार
येत्या ऑक्टोबरमध्ये मी मुंबई विमानतळावर उतरेन आणि तेथून रस्त्याने गोव्याला जाईन. महामार्गाची स्वतः पाहणी करून प्रवाशांसाठी प्रवास किती सोयिस्कर झाला आहे याची तपासणी करेन, असेही गडकरी म्हणाले.
अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार
‘मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरले आहेत. जगात सात रेकॉर्ड्स झाले आहेत. आता मलाही रेकॉर्ड करायचा आहे की, वर्षभरात जास्तीत जास्त कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि अधिकाऱयांना निलंबित करण्याचा,’ असे म्हणत गडकरी यांनी या महामार्गाच्या कामातील विलंब आणि खराब अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. कामाच्या गुणवत्तेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही आणि वेळेवर काम न करणाऱयांना तर सोडणारच नाही, असेही त्यांनी बजावले.






























































