
रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्यात आल्यानंतर आता प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) पातळीवर मीटर रिकॅलिब्रेशनच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीनुसार मीटरचे पुनर्प्रमाणीकरण करण्यासाठी आरटीओच्या ट्रकवर ‘रोड टेस्ट’ची (रस्ता चाचणी) सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मीटरप्रमाणेच प्रवाशांकडून सुधारित भाडे घ्यावे लागणार आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ अलीकडेच लागू झाली आहे. त्यानुसार रिक्षाचे किमान भाडे 27 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 33 रुपये झाले आहे. या सुधारित दराने भाडे आकारण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मीटर रिकॅलिब्रेशन करणे बंधनकारक आहे. त्याचअनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार सध्या आरटीओ कार्यालयांमार्फत मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.






























































