
शिवसेनेचे मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची आज रात्री अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. पुर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करण्यात आले. या हल्ल्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर तिसऱ्याच दिवशी एका शिवसैनिकाची हत्या झाल्याने ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉल जवळून आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर आपल्या घरी जात होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना घेरून त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
आंदोलनाची केली होती तयारी
प्रदीप पुर्णेकर यांनी स्थानिक बिल्डरविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनासाठी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली होती. त्यानंतर दोन दिवसातच त्यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.






























































