
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या पुरूष संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत हिंदुस्थानने श्रीलंकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीमध्ये हिंदुस्थानचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांमध्ये 7 बाद 169 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी याने 21 चेंडूत 38 धावा चोपत हिंदुस्थानला दणक्यात सुरुवात करून दिली. मात्र अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन (प्रत्येकी 7 धावा) विशेष कामगिरी करू शकले नाही.
मधल्या फळीत आलेल्या ईशान किशन याने मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 46 चेंडूत नाबाद 80 धावांची लयलूट केली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. वैभव आणि ईशान व्यतिरिक्त इतर फलंदाज आल्या पावली माघारी परतले.
to finish things off ☝️☝️☝️#TeamIndia strike thrice is as many deliveries to secure a massive win and reach the Gold Medal contest
Scorecard ▶️ https://t.co/DjHV9q6htT#AsianGames pic.twitter.com/P4kb2TXIRE
— BCCI (@BCCI) October 1, 2026
हिंदुस्थानने विजयासाठी दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची त्रेधातिरपीट उडाली. श्रीलंकेचा संपूर्ण डाव 9.5 षटकात 45 धावांमध्ये आटोपला. नुवांदू फर्नांडो याने सर्वाधिक 15 धावा केल्या. इतर दहा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली. श्रीलंकेचे तीन फलंदाज धावबाद झाले.
पाकिस्तानशी सामना
दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. बांगलादेशने विजयासाठी दिलेले 112 धावांचे आव्हान पाकिस्तानने 11.3 षटकांमध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. आता रविवार 4 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघात सुवर्णपदकाचा सामना रंगणार आहे.


























































