इन्स्टावर रिल बघितली अन् गुजरातच्या भाजी विक्रेत्याने 100, 500 रुपयांची नोट घरीच छापली; श्रीमंत व्हायचा ‘शॉर्टकट’ तुरुंगात घेऊन गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी अनेकदा लोक नसते उद्योग करतात आणि नंतर हे उद्योग अंगाशी येतात. याचाच प्रत्यय आता गुजरातमधील एका भाजी विक्रेत्याला येत आहे. कर्जबाजारी झालेल्या या भाजी विक्रेत्याने इन्स्टाग्रामवर रील पाहून आणि टेलिग्रामवरून बनावट नोटा छापण्याचा प्रशिक्षण घेतले. त्यानंतर घरातच 100, 500 रुपयांच्या बनावट नोटा छापायला सुरुवात केली. आता राजकोट शहर गुन्हे शाखेने आणि एसओजीने संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे श्रीमंत होण्याचा शॉर्टकट या भाजी विक्रेत्याला थेट तुरुंगात घेऊन गेला आहे.

किशन सोळंकी (वय – 31) असे अटक करण्यात आलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून तो राजकोटमधील मानदादुंगर भागात राहतो. किशन हा राहत्या घरात बनावट नोटा छापण्याचे रॅकेट चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा आणि एसओजीच्या पथकाने त्याच्या घरावर अचानक छापा टाकला आणि त्याला रंगेहाथ पकडले, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) जगदीश बांगरवा यांनी दिली. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलीस छाप्यादरम्यान किशनच्या घरातून 100 रुपयांच्या 216 बनावट नोटा आणि 500 रुपयांच्या 3 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय छपाईसाठी वापरले जाणारे संगणक, दोन प्रिंटर, लॅमिनेटर-हीटर मशीन, बटर पेपर आणि 100 रुपयांच्या नोटांची अर्धवट छपाई झालेले कागद जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सर्व उपकरणांचे एकूण मूल्य 65,500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.