

शास्त्री भवनातील ऐतिहासिक ग्रंथालयात 10 लाख पुस्तके आहेत. मोदींच्या `सेंट्रल विस्टा’ प्रकल्पासाठी शास्त्री भवन पाडले जाईल, पण 10 पुस्तके ठेवण्यासाठी देशाच्या राजधानीत जागा नाही. ग्रंथ व इतिहास संपवा ही प्रत्येक लोकशाहीविरोधी राज्यकर्त्याची भूमिका असते. त्यानुसार भारतात ज्ञानाचा नाश सुरू आहे…
देशात मोदी-शहा वगैरेंची राजवट आल्यापासून देशाचा सांस्कृतिक आणि वैचारिक दर्जा घसरत चालला आहे. मोगलांच्या आक्रमणात भारताची सांस्कृतिक उच्च परंपरा नष्ट झाली. तसेच काहीसे गेल्या दहा वर्षांत घडले. इतिहास, ग्रंथ, पुस्तके याबाबत सध्या सरकार गंभीर नाही. राज्य करणे म्हणजे इतिहास, ग्रंथ नष्ट करणे असा अर्थ होत नाही. आपल्या पूर्वसुरींनी ज्या भव्य सांस्कृतिक संस्था उभ्या केल्या त्या वास्तूंवर आपल्या गटाचा ताबा मिळवणे असे होत नाही. एखाद्या देशाचे सांस्कृतिक क्षेत्र जेव्हा धर्मांध व राजकारणग्रस्त होते तेव्हा त्या देशाच्या भविष्याला लकवा मारतो. सध्या आपला देश त्याच मार्गाने निघाला आहे. नवा विषय असा आहे की, सेंट्रल विस्टा या मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी ऐतिहासिक शास्त्री भवनावर बुलडोझर फिरवले जाणार आहेत. हातोडे मारण्याची कारवाई सुरू झाली आहे. शास्त्री भवनात 135 वर्षे जुनी सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररी आहे. ती लायब्ररी तेथून हटवली जात आहे. हत्या करण्यात आलेला मृतदेह हटवला जावा त्याच पद्धतीने. या ग्रंथालयात साधारण दहा लाख पुस्तके, अनेक ऐतिहासिक दस्तावेज, दुर्मिळ ग्रंथ आहेत. ते ग्रंथ बाहेर काढले जात आहेत. वर्षानुवर्षे हे ग्रंथालय शास्त्री भवनात सुरू आहे. पण मोदींच्या नव्या रचनेत या ऐतिहासिक ग्रंथालयाला जागा उपलब्ध नाही. सध्या या पुस्तकांसाठी मोदी यांनी एका सरकारी इमारतीत दोन छोटय़ा खोल्या दिल्या. दहा लाख पुस्तके, दस्तावेज वगैरे फक्त दोन खोल्यांत कसे मावणार? म्हणजे एका भव्य ऐतिहासिक ग्रंथालयावर मोदी यांच्या सरकारने बुलडोझर फिरवला आहे. हे ग्रंथालय अनेक सरकारी अधिकारी, केंद्रीय स्पर्धा परीक्षांना बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी मोठाच `ठेवा’ ठरले होते.
सुवर्णकाळ संपला
भारताचा सांस्कृतिक सुवर्णकाळ संपला आहे. भारतातले पूर्वीचे राज्यकर्ते पुस्तकांच्या जगात वावरत होते. गांधी, नेहरूंनी स्वत: अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या लेखनास जागतिक मान्यता मिळाली. नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने दीनदयाळ उपाध्याय यांच्यापेक्षा मोठा लेखक भारतात नाही. संपूर्ण भाजपाचे तेच मत आहे. एक तर सध्याच्य्या सरकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक, वैचारिक झेप तोकडी आहे. 2014 सालानंतरच भारत स्वतंत्र झाला असे त्यांना वाटते. त्यामुळे 1891 साली स्थापन झालेल्या शास्त्री भवनातल्या ग्रंथालयास त्यांची मान्यता नाही.
पुन्हा या ग्रंथालयात भारतीय स्वातंत्र्य समरावर प्रकाश टाकणारे अनेक ग्रंथ व ऐतिहासिक दस्तावेज आहेत. या इतिहासाच्या पानावर भाजपचा संदर्भ कोठेच नाही. त्यामुळे अशी ग्रंथालये भाजपला अस्वस्थ करत आहेत.
त्यांच्या दृष्टीने तो 5500 वर्ग मीटरचा तो एक भूखंड आहे. भूखंडावर पुस्तके ठेवल्याने जमिनीचे मोल काय राहणार? त्यामुळे शास्त्री भवनातील लायब्ररी नष्ट केली जात आहे. अर्थात, राज्यकर्ते नष्ट होतात, पण पुस्तके अमर आहेत, हेच वास्तव आहे. ज्ञानाच्या कक्षा छापील पुस्तकेच वाढवत आहेत. पुस्तके विकत घेणे व जमवणे हा एक महान छंद आहे. ते कष्टाचे काम आहे. आाक्सफर्ड, केम्ब्रिजमधली ग्रंथालये महान आहेत. तेथील विद्यार्थी, दर्दी वाचकही महान आहेत. रोजर बेकन हा आाक्सफर्डचा हुशार विद्यार्थी. त्या काळात बंदुकीची दारू तयार करण्याची प्रािढया त्याला माहीत होती. खगोलशास्त्राविषयी शेकडो पुस्तके त्याने जमवली होती. आपल्या आवडत्या विषयाच्या अभ्यासाकरिता त्याने त्या काळात पाच हजार पौंड किमतीची पुस्तके जमवली होती. बेकन याने चेटुक विद्येवर पुस्तके जमवून त्यावरही अभ्यास केला. त्यामुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात त्याच्यापासून इतर लोक लांब राहत. वादविवाद होत. मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांताला (डार्विन) विरोध करणारे विद्वान तेथील ग्रंथालयात होते. (सध्या असे लोक भारतात आहेत.) या सिद्धांतावर एकदा पराकोटीचा वाद झाला, तेव्हा थामस हक्सल याला उद्देशून आाक्सफर्डच्या बिशपने हक्सलचे आजोबा वगैरे माकड असतील असे म्हटले. तेव्हा हक्सल म्हणाला, माझे आजोबा माकड असले तरी मला लाज वाटणार नाही; पण इतिहास, विज्ञान आणि सत्य झाकणाऱयांशी संबंध असणे जास्त लज्जास्पद ठरेल. हे ऐकल्यावर ग्रंथालयातील एका स्त्रीला भोवळ आली. आजही दुसरे काय सुरू आहे? य्सत्य व इतिहास झाकला जात आहे व त्यासाठी ग्रंथालये नष्ट केली जात आहेत. पुस्तके व ग्रंथालये अमर आहेत असे आाक्सफर्ड विद्यापीठातील ग्रंथालयात सांगितले जात होते. या विद्यापीठाच्या ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना, आपण अमर आहोत असे समजून अभ्यास करा आणि उद्याच मरणार आहोत असे समजून जगा, असा उपदेश केला जात असे. त्यात आजही बदल करण्याची गरज नाही.
संस्थांवर कब्जा
मुंबईतील विख्यात एशियाटिक ग्रंथालयाचा ताबा भाजपने मिळवला आहे. त्यानंतर त्या ग्रंथालयास गृहमंत्री अमित शहांनी भेट दिली. याच ग्रंथालयात कधी काळी दुर्गा भागवतांचा वावर होता. शहा यांचा उल्लेख हा भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य व संस्कृतीविरोधक असाच होतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वास्तूवर या लोकांची नजर आहे. साहित्यविषयक संस्था, साहित्य परिषदा, राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन, नाशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ या क्षेत्रांतले पुरस्कार देणाऱ्या समित्यांवर भाजपने अवैधरीत्या कब्जा मिळवला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत पुण्यात काय घडले ते समोर आले आहे. सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना नष्ट करणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा अजेंडा आहे. जगाच्या इतिहासात अनेक राज्यकर्त्या सम्राटांनी हेच केले. ग्रंथालये व इतिहास नष्ट करण्याचे प्रकार चीन, बगदाद, जर्मनी, जाफना, स्पेन येथे घडले. बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळले आणि त्यातील ग्रंथालयास आग लावली तेव्हा ते तीन महिने जळत होते. बगदादमधील हल्ल्यात मंगोल सेनापती हुलेगु खान याने तेथील सर्व ग्रंथालये नष्ट केली. टायग्रीस नदीत ग्रंथ फेकले तेव्हा ती नदी शाईने काळी झाली. नाझी जर्मनीत 1933 साली उदारमतवादी लेखकांची लाखो पुस्तके सार्वजनिकरीत्या जाळली गेली. ग्रंथालये नष्ट केली की विचार व इतिहास क्षीण होता असे हुकूमशहांना वाटत असते. प्रत्यक्षात तसे कधीच घडत नाही. जळतो तो कागद. विचार कायम असतो. नवीन राजवट जुना इतिहास पुसून टाकते. ज्ञान नष्ट करते. राजकीय युद्धातही सांस्कृतिक नेत्याला अडगळीत टाकते. ग्रंथ जाळणे, ग्रंथांना योग्य जागा न देणे, ग्रंथ लपवून ठेवणे म्हणजे फक्त कागद नष्ट करणे नाही. तो स्मृती, वाद, सत्य नष्ट करण्याचा प्रयत्न असतो. तो ज्ञानाचा नाश असतो. भारतात सध्या ज्ञानाचा नाश सुरू आहे! पण ज्ञानाचा दिवा कधीतरी क्षीण होतो, तो विझत तर कधीच नाही.
X handle – @rautsanjay61
Gmail – [email protected]

































































