
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६ हजार कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे.जिल्हा बॅंकेला ४९ कोटी १३ लाख ३६ हजार रुपयांचा नफा प्राप्त झालेला आहे. ३० सप्टेंबरपर्यंतचा अर्धवार्षिक अहवाल बॅंकेने जाहीर केला असून गतवर्षी पेक्षा १० कोटी ७४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झालेली आहे. ग्राहकांना एईपीएस सुविधा देणाऱ्या राज्यातील तीन जिल्हा सहकारी बँकामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला स्थान मिळाले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहक सेवा आणि आधुनिकतेवर भर देऊन डिजीटालायझेशनला महत्त्व दिले आहे. एनईएफटी, आरटीजीअस, एटीएम,मोबाईल बॅंकिंग आणि क्यू आर कोड सारख्या सुविधा ग्राहकांना देत असताना बॅंक जिल्ह्यातील ग्राहकांरिता एपीईएस सुविधा कार्यान्वित करत आहे. अशा प्रकारे एईपीएस सुविधा ग्राहकांना देणाऱ्या राज्यातील तीन जिल्हा बँकापैकी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक बॅंक आहे. बॅंकेच्या व्यवसायात आणि नफ्यात यशस्वी वाढ झाल्याबद्दल जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि सर्व संचालकांनी बॅंकेच्या सभासदांचे आभार मानले आहेत. संचालक मंडळाने घेतलेले अचूक निर्णय आणि बॅंकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने केलेले प्रयत्न यामुळे हे यश प्राप्त झाले, असे मत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी सांगितले.






























































