ठाकरेंची गर्जना; ज्ञानू गेट आऊट! लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्र पेटून उठला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील निवडणूक घोटाळे आणि मतचोरीविरोधात मुंबईत आज आंदोलनाची ठिणगी पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अफाट आणि विराट ‘गर्जना’ मोर्चात अवघा महाराष्ट्र एकवटला. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना-मनसेने दिलेल्या हाकेला विविध राजकीय पक्षांसह जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता मोर्चासाठी गर्दीचे तुफान उसळले. या गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमारांसह मोदी सरकारच्या मनमानीवर आसुड ओढताच हजारोंच्या जनसमुदायाने मुठी आवळून ‘इंडिया अगेन्स्ट व्होट चोर’चा नारा बुलंद केला. ‘अजूनही वेळ गेलेली नाही. आज आम्ही फक्त पाऊल उचलले आहे. आमचे हक्क हिरावून घेणार असाल तर उद्या हातही उचलावा लागेल,’ असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तर ‘सत्तेवर कोणी यायचे हे जनता ठरवेल, निवडणूक आयोग नाही,’ असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ठाकरेंच्या या मोर्चाने दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले असून ‘घोटाळेबाज ज्ञानू गेट आऊट’ अशी गर्जना घुमली.

निवडणूक आयोगातील बंडाळीमुळे देशात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मतचोरीची पोलखोल झाली आहे. मतदारांच्या या अपमानाच्या विरोधात देशभरात संतापाचा आगडोंब उसळला आहे. ज्ञानेश कुमार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारमुळे लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. त्याच्या संरक्षणासाठी शिवसेना-मनसेने गर्जना मोर्चा काढला. हातात तिरंगा झेंडा घेऊन महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने लोकशाहीप्रेमी नागरिक मुंबईत धडकले होते. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मोर्चाला काही क्षणांतच जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले. अभूतपूर्व अशा या मोर्चाची देशातील राजकीय वर्तुळात, मीडियात आणि घराघरात चर्चा आहे.

मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

गर्जना मोर्चाच्या व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे सुभाष लांडे उपस्थित होते. शर्मिला ठाकरे, शिवसेना नेते अनंत गीते, विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, सुनील प्रभू, राजन विचारे, आमदार सुनील राऊत, संजय पोतनीस, महेश सावंत, बाळा नर, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, साईनाथ दुर्गे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सुषमा अंधारे, भाऊ कोरगावकर, विजय कदम, दिनेश बोभाटे, मनसेचे अभिजित पानसे, अविनाश जाधव, शालिनी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांचीही प्रमुख उपस्थिती होती.