
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या जलवाहिनीची येत्या मंगळवारी तांत्रिक दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे आणि खारघर नोडमधील नळही याच दिवशी कोरडे राहणार आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असला तरी पाण्याचा दाब कमी राहणार आहे.
मंगळवारी सकाळी १० ते बुधवारी पहाटे २ या कालावधीत ही कामे केली जाणार आहेत. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पंपाचा चॅनेल विलग करण्यासाठी एम.एस. प्लेट बसविणे, नवीन मीटरिंग कीऑस्क बसविणे तसेच मोरबे मुख्य जलवाहिनीवर जलमापक बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्राजवळील दोन हजार ५० मिलीमीटर व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर जलमापक बसविण्यात येणार आहे. याशिवाय सीबीडी सेक्टर-७येथे एक हजार ८०० मिलीमीटर व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा पूर्ववत केल्यानंतर जलवाहिनीतील प्रवाह सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी केले आहे.






























































