
राहुल गोखले
लष्करी गणवेशात सैनिकाला रणांगणावर मृत्यू यावा तसा प्रख्यात लेखक जेफ्री आर्चर यांना लिहिता लिहिता मृत्यू आला. ‘अॅडम अँड ईव्ह’ ही आपली शेवटची कादंबरी असेल, असे त्यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. त्या कादंबरीच्या प्रकाशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते लंडनमध्ये आपल्या शेकडो चाहत्यांना भेटले आणि या पुस्तकाच्या प्रतींवर स्वाक्षऱ्या केल्या. 6 ऑक्टोबर रोजी त्या कादंबरीचे प्रकाशन होणार होते; तत्पूर्वीच एक दिवस आर्चर यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि एका विलक्षण लोकप्रिय लेखणीला विराम मिळाला.
जगविख्यात लेखक जेफ्री आर्चर यांच्या कादंबऱ्या आणि लघुकथांमध्ये जे नाटय़ व अनपेक्षित धक्के असत, त्यापेक्षा जास्त मोठा धक्का त्यांनी आपल्या जगभरातील कोटय़वधी चाहत्यांना दिला असेच म्हटले पाहिजे. तीसहून जास्त कादंबऱ्या, सात कथासंग्रह, तीन कारावासातील दैनंदिन्या, तीन नाटके आणि बालसाहित्याची सात पुस्तके असे मोठे साहित्य ते मागे ठेवून गेले आहेत. ते साहित्य यापुढेही वाचकांना आनंद देत राहील यात शंका नाही.
आर्चर यांचे आयुष्यच असंख्य नाटय़मय वळणांनी भरलेले होते. ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना त्यांचा संपर्क अशा विद्यार्थ्यांशी आला जे पुढे जाऊन राजकारण, अर्थशास्त्र किंवा माध्यमांच्या क्षेत्रात नावाजले गेले. त्याच संपर्कातून हुजूर पक्षाची उमेदवारी मिळवत आर्चर यांनी लंडनच्या महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला. 1969 मध्ये लोऊथ मतदारसंघातून पोटनिवडणुकीत ते ब्रिटनच्या संसदेवर निवडून गेले. राजकीय क्षेत्रात त्यांची कारकीर्द अशीच बहरत राहिली असती, पण 1974 मध्ये पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कॅनडाच्या एका कंपनीत गुंतवणूक करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अंगलट आला. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आणि दिवाळखोरीचा सामना करावा लागलाच, पण त्यांना खासदारकीही सोडावी लागली.
ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले होते, त्या सर्वांचे उसने पैसे पुस्तकातून मिळालेल्या मानधनातून परत करण्याची ग्वाही त्यांनी दिली आणि त्या अपरिहार्यतेतून साकार झाली त्यांची ‘नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस’ नावाची पहिली कादंबरी. आर्चर यांच्या आर्थिक विपन्नावस्थेच्या स्वानुभवातूनच त्या कादंबरीचे कथानक प्रेरित झाले होते असे म्हटले जाते.
समीक्षकांनी त्या कादंबरीला फारसे गौरविले नाही तरी ब्रिटन व अमेरिकेत ती मोठय़ा प्रमाणावर विकली गेली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत त्यांची ‘केन अँड एबेल’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्या पुस्तकाने आजवर तीन कोटींहून अधिक प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’ ही त्यांनी लिहिलेली कादंबरी राजकीय पार्श्वभूमीवर बेतलेली होती आणि तीही तुफान खपली. त्यानंतर त्यांची पुस्तके येतच राहिली आणि वाचकांच्या त्यावर उडय़ा पडत राहिल्या. इतक्या की, ‘संडे टाईम्स’च्या बेस्टसेलरच्या यादीत त्यांचे स्थान तब्बल चौदा वर्षे कायम होते, तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या बेस्टसेलरच्या यादीत ते सतत पाच वर्षे झळकत होते.
याला कारणीभूत होती ती आर्चर यांची लेखनशैली. बोजड किंवा अलंकृत भाषा न वापरता सोप्या, सरळ भाषेतूनही नाटय़ निर्माण करता येते, वाचकांची उत्कंठा ताणून धरता येते याचा त्यांच्या कादंबऱ्या हा एक वस्तुपाठच होता. त्यांच्या कथा-कादंबऱ्या वेगवान आणि अनपेक्षित वळणे घेणाऱ्या कथानकांसाठी ओळखल्या जात, तद्वत त्यांच्या लेखणीतून राजकारण, उद्योगविश्व, गुन्हेगारी आणि मानवी स्वभावाचे गुंतागुंतीचे पैलू सोप्या भाषेत मांडले जात.
प्रत्येक कथेच्या किंवा कादंबरीच्या शेवटी येणारी जबरदस्त आणि धक्कादायक कलाटणी हे जेफ्री आर्चर यांच्या साहित्याचे वैशिष्टय़ होते व वाचक त्याने थक्क होत असत. ‘बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर’ या कादंबरीतील ‘बर्थ इज लाईफ्स फर्स्ट लॉटरी तिकीट’ हे वाक्य असो किंवा ‘नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस’मधील ‘ही हॅज स्टोलन फ्रॉम पह्र मेन. ही विल नाउ रिटर्न व्हॉट ही स्टोल्ड, टू द एक्झॅक्ट पेनी. नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस’ हे वाक्य असो. अशा प्रकारची चटकदार वाक्ये कथानकाची खुमारी वाढवत असत आणि वाचकांना खिळवून ठेवत असत.
आजवर त्यांच्या पुस्तकांच्या जगभरात 119 देशांत 30 कोटी प्रती खपल्या आहेत आणि पन्नासेक भाषांत त्यांची भाषांतरे झाली आहेत ही त्यांच्या वाचकप्रियतेची पावतीच. मात्र हे यश आर्चर यांनी मेहनतीने मिळविले होते हे तितकेच खरे. आपल्या प्रत्येक पुस्तकाचे किमान चौदा वेळा ते पुनरावलोकन आणि आवश्यक तेथे पुनर्लेखन करीत असत. ‘केन अँड हाबेल’ या कादंबरीचे तर त्यांनी अठरा वेळा मसुदे तयार केले होते. आपल्या साहित्यातील प्रत्येक शब्दाच्या नेमकेपणाबद्दल त्यांचा आग्रह असे आणि त्यांचे साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरण्यास त्यांची ही परिपूर्णतेची ओढ कारणीभूत होती.
आपण रोज रात्री डिकन्स किंवा अगाथा ख्रिस्ती यांची पुस्तके वाचल्याशिवाय झोपत नाही, असे त्यांनी सांगितले होते आणि सकाळी सहा वाजता उठून आपण लिहायला बसतो व शिस्तबद्धपणे ठरावीक वेळ लेखन करतो, असेही त्यांनी म्हटले होते. आपल्या उशाशी नेहमी एक वही ठेवलेली असते आणि आपल्याला कधीही रात्री-अपरात्री काही सुचले तर ते आपण त्यात नोंदवून ठेवतो असे सांगतानाच एकदा पहाटे तीन वाजता आपल्याला एक वाक्य सुचले व आपण त्या वहीत नोंदवून ठेवले; तेच पुढे एका कादंबरीच्या प्रकरणातील खुमासदार वाक्य ठरले अशी आठवण त्यांनी सांगितली होती. त्यावरून त्यांच्या लेखनध्यासाची कल्पना येऊ शकेल. साहित्यावर निष्ठा असल्याशिवाय हे शक्य नसते.
भारतावर आर्चर यांचे प्रेम होते. सुनील गावसकरपासून विराट कोहलीपर्यंत क्रिकेटपटू त्यांना अतिशय आवडत. इंग्रजीतून लेखन करणाऱया भारतीय लेखकांपैकी आर. के. नारायण हे त्यांचे आवडते लेखक होते. भारतात आर्चर यांच्या पुस्तकांना मोठी लोकप्रियता लाभली होती आणि याची प्रचीती त्यांना 2019 मध्ये जयपूर साहित्य जत्रेत आली. आपल्याला ऐकायला हजारो रसिक तेथे उपस्थित असल्याचे पाहून आर्चर भारावून गेले होते. मात्र तरीही आर्चर यांनी आपल्या कथा-कादंबऱयांतून भारतीय पात्रे अपवादानेच समाविष्ट केली.
भारतावर आपले प्रेम असले तरी पात्रे समाविष्ट करण्याइतपत भारत आपल्याला समजलेला नाही, अशी कबुली ते देत असत हे त्यांच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण होते.
जेफ्री आर्चर यांच्या झगमगाटी बाजूबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वादग्रस्त बाजूही होती. काही प्रकरणांमुळे ते वादग्रस्त ठरले. राजकारणाकडे ओढा असूनही या प्रकरणांमुळे हुजूर पक्षात व पर्यायाने राजकीय क्षेत्रात ते स्थिरावू शकले नाहीतच, पण त्यांचे आयुष्यही काही प्रमाणात त्यामुळे झाकोळले गेले. तथापि तरीही विलक्षण लोकप्रिय लेखक म्हणून त्यांची स्मृती कायम राहील आणि त्यांच्या लेखणीतून अवतरलेले अक्षरविश्व यापुढेही वाचकांना खिळवून ठेवेल यात शंका नाही.
(लेखक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)






























































