
साधना गोरे
‘राशीचक्र’वाले शरद उपाध्ये एका मुलाखतीत सांगतात, ‘बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की, कर्क रास असलेल्या मनुष्याला कॅन्सर होतो, पण कर्क राशीचा कॅन्सरशी काहीएक संबंध नाही.’ हा संबंध आजाराशी नसला तरी त्या शब्दातील मूळ संकल्पनेशी मात्र खात्रीने आहे. तो संबंध कसा आहे याविषयीची माहिती आपण ‘कर्करोग आणि कॅन्सर’ या गेल्या लेखात पाहिली. आज आपण कर्क रास, कर्कवृत्त आणि कर्कटक (कंपास) या शब्दांची माहिती समजून घेणार आहोत.
‘कर्क’ शब्दाच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ खेकडा असा आहे. कर्करोगाव्यतिरिक्त हा शब्द कर्क रास, कर्कवृत्त, कर्कटक या रूपांमध्येही पाहायला मिळतो. यासंदर्भातही ‘कर्क’ शब्दाचा अर्थ खेकडा असाच आहे. कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. प्राचीन काळी खगोलशास्त्रज्ञांनी आकाशातील ताऱ्यांच्या समूहांचे म्हणजे नक्षत्रांचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांना त्यातील एका तारकासमूहाचा आकार खेकडय़ासारखा दिसला, म्हणून त्यांनी त्याला ‘कर्क’ हे नाव दिलं. हीच कर्क राशी होय. इंग्रजीतही या राशीचं नाव खेकडा म्हणजे ‘कॅन्सर’ असंच आहे.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक आणि भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील काल्पनिक रेषांचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली. दरवर्षी 21 जून रोजी सूर्य आकाशात अगदी उत्तर दिशेला त्याच्या सर्वोच्च बिंदूवर असतो. हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी पृथ्वीवरून पाहिलं असता सूर्य नेमका कर्क राशीत प्रवेश करताना दिसायचा. या दिवशी सूर्य ज्या काल्पनिक रेषेवर अगदी डोक्यावर (90 अंशावर) चमकतो, त्या रेषेला खगोलशास्त्रज्ञांनी ‘कर्क राशीची रेषा’ म्हणजेच ‘कर्कवृत्त’ असं नाव दिलं. इंग्रजीत कर्कवृत्ताला Tropic of Cancer म्हटलं जातं. हा ‘Tropic’ शब्द ग्रीक भाषेतील ‘Tropos’ वरून आला आहे. त्याचा अर्थ ‘वळणे’ असा होतो. 21 जून रोजी सूर्य या रेषेवर पोहोचल्यावर तिथून पुढे उत्तरेकडे न जाता पुन्हा दक्षिणेकडे वळतो. आपण या वळणाला दक्षिणायन म्हणतो. काही खगोलशास्त्रज्ञांनी याला आणखी एक रंजक संदर्भ जोडला आहे. खेकडा हा प्राणी सरळ न चालता बुद्धिबळातल्या घोडय़ाप्रमाणे नेहमी तिरपा चालतो. 21 जूननंतर सूर्याची आकाशातील गतीही अशीच तिरपी किंवा बदलणारी (उलटी) होते. त्यामुळेही या वळणास ‘कर्क’ (खेकडा) हे नाव योग्य मानलं गेलं.
शाळेत असताना आपण सगळे भूमितीच्या तासाला वर्तुळ काढण्यासाठी जे साधन वापरत असू. त्याला कर्कटक म्हणायचो. काहींनी याच कर्कटकाने बाकांवर खरडवून खरडवून आपल्या पहिल्यावहिल्या प्रिय व्यक्तींची नावं अमर केली असतील किंवा आणखी काही शिल्पाविष्कार घडवले असतील. तर सांगायचा मुद्दा असा की, या कर्कटकचा अर्थही खेकडा असाच आहे. कसं काय म्हणता? खेकडय़ाचे पुढचे दोन पाय किंवा नांग्या तुम्ही कधी ना कधी पाहिल्या असतील. तर या नांग्या इंग्रजी ‘व्ही’ (V) अक्षरासारख्या दोन बाजूंना उघडतात आणि मिटतात. खेकडा आपल्या या नांग्यांचा वापर करून वस्तू घट्ट पकडतो. कर्कटकाची दोन टोकंसुद्धा अगदी हुबेहूब खेकडय़ाच्या नांग्यांसारखी दिसतात आणि हलतात. खेकडय़ाच्या नांग्यांचा आकार व हालचाल यांवरून वर्तुळ काढण्याच्या या साधनाला ‘कर्कटक’ हे नाव देण्यात आलं.
आयुर्वेदात ‘कर्कटशृंगी’ किंवा ‘मेषशृंगी’ नावाची एक औषधी वनस्पती आहे. मराठीत तिला ‘काकडशिंगी’ किंवा ‘मेढशिंगी’ म्हणतात. या वनस्पतीच्या नावात ‘कर्क’ शब्द आहे, त्याचा अर्थ खेकडा असाच आहे. दाते-कर्वे शब्दकोशात या शब्दाची माहिची पुढीलप्रमाणे दिली आहे – एक औषधी वनस्पती. हिरडय़ाच्या पानांच्या देठाशी रस जमून तिथे पह्डासारखी ग्रंथी बनते ती शेंग. हिचा रंग काळसर असून आकार खेकडय़ाच्या आकडय़ाप्रमाणे किंवा बोकडाच्या शिंगाप्रमाणे असतो. म्हणून या वनस्पतीला हे नाव पडले.
थोडक्यात सांगायचं तर, कॅन्सर आजारात ज्या गाठी होतात, त्यांचा आकार खेकडय़ांप्रमाणे दिसतो. त्यावरून या आजाराला संस्कृत आणि मराठीतही कर्करोग म्हटलं गेलं. तर आकाशातील खेकडय़ाच्या आकाराच्या तारकासमूहामुळे त्या राशीला कर्क म्हणतात आणि त्या राशीच्या जवळून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला कर्कवृत्त म्हणतात. कंपास म्हणजे कर्कटकाचा आकार खेकडय़ाच्या नांग्यांसारखा दिसतो. काकडशिंगीतही हाच खेकडा आहे. या सगळ्याच्या मुळाशी ‘खेकडा’ ही मूळ संकल्पना असली तरी त्यांचे संदर्भ पूर्णपणे वेगळे आहेत.






























































