
नांदेडकरांना उष्णतेच्या झळांमधून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यासाठी 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या दोन दिवसांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच संभाव्य हवामानाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन दिवसांच्या काळात नागरिकांनी वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षिततेच्या उपायांचा भाग म्हणून नागरिकांनी घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत आणि खांब, लोखंडी तारा तसेच धातूच्या वस्तूंपासून लांब राहावे. शेतकरी, शेतमजूर, प्रवासी आणि उघड्यावर काम करणाऱ्या व्यक्तींनी या हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


























































