
ऐन दिवाळीच्या तोंडावर डीजे व मोठय़ा आवाजाचे फटाके वाजवण्यास लागू केलेली बंदी वर्षभरासाठी असेल, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. ध्वनी व वायू प्रदूषणामुळे लोकांना त्रास होता कामा नये यासाठी हे आदेश लागू केले जात आहेत. याबाबत राज्य शासन, मुंबई महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनजागृती करावी, असेही न्यायालयाने नमूद केले.
रस्त्यावर, चौकात व सार्वजनिक ठिकाणी ध्वनी व वायू प्रदूषण करणारे फटाके वाजता कामा नयेत. यासाठी लोकांना जागृत करा. सोशल मीडिया, बस स्टॉप, रेल्वे स्टेशनसह सर्व ठिकाणी याचे फलक लावा. जनजागृतीच्या मार्गाने प्रदूषणाला नक्कीच अटकाव करता येईल, असे न्या. गिरीश पुलकर्णी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने नमूद केले. फटाके व्यवसाय व उत्पादनाला टाळे लावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. पण पर्यावरण व आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या फटक्यांवर निर्बंध हवेत. कमी आवाजाचे व वायू प्रदूषण न करणारे फटाके फोडले जावेत. लोकांनी अधिकाधिक हरित फटक्यांचा वापर करावा. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणारच नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मिरवणुकांतील लाऊडस्पीकरसाठी परवानगी आवश्यक
उत्सव मिरवणुकांमध्ये वाजणाऱ्या लाऊडस्पीकरसाठी पोलीस परवानगी आवश्यक असेल. मंडळाकडून एक लाखाची तर कोणाला व्यक्तिगत ही परवानगी देताना 50 हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल. ध्वनी प्रदूषण झाल्यास ही रक्कम पोलिसांनी जप्त करावी हे गेल्या महिन्यात दिलेले आदेश वर्षभरासाठी लागू राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सेलिब्रेटींची मदत घ्या
ध्वनी व वायू प्रदूषण रोखण्यासाठी, कमी आवाजाचे फटाके पह्डले जावेत यासाठी जनजागृती करताना सेलिब्रेटींची मदत घ्या. जेणेकरून जनजागृती अधिक प्रभावी होईल, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.































































