
पूर्व प्राथमिक ते इयत्ता पहिलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी राज्य शासनाने वयोमर्यादा निश्चित केली आहे. पुढील वर्षीपासून ती टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षात नर्सरी प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे तर 2020-31 या वर्षात पहिलीला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्याने वयाची 6 वर्षे पूर्ण केलेली असावीत, असे निकष ठरवले गेले आहेत. विद्यार्थ्याचे वय 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
15 दिवसांची सूट देण्याची शाळेला मुभा
पूर्व-प्राथमिक वर्गातील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वयोमर्यादेत 15 दिवसांची सूट देता येईल. पायाभूत वर्गांतील नामांकन आणि नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील सूचनांचे पालन करावे लागेल. नवीन वयोमर्यादेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
विद्यमान विद्यार्थ्यांना वयोमर्यादेतून सूट
शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांना नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनाही पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयाचे निकष लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
प्रवेशासाठी वयोमर्यादा…
बालवाटिका-1 अथवा नर्सरी –
3 वर्षे पूर्ण (2027-28 पासून)
बालवाटिका-2 अथवा ज्युनिअर के.जी. – 4 वर्षे पूर्ण
(2028-29 पासून)
बालवाटिका-3 अथवा सिनिअर के.जी. – 5 वर्षे पूर्ण
(2029-30 पासून)
इयत्ता पहिली – सहा वर्षे पूर्ण (2030-31 पासून)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
2020 मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने हे वयाचे निकष निश्चित केले आहेत. विविध बोर्डाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळय़ा दिनांकांनुसार वयोमर्यादा ग्राह्य धरली जात होती. पेंद्र शासनाने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे कळविले आहे.


























































