
मुंबईची वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मनोरी येथे उभारण्यात येणाऱया निःक्षारीकरण प्रकल्पात सागरी जैव विविधता जपली जाणार असून हा प्रकल्प पर्यावरणपूरकच राहणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला सध्या सुरुवात करण्यात आली असून जिओ टेक्निकल सर्वेही सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून 200 दशलक्ष लिटर आणि दुसऱ्या टप्प्यातून 200 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती आज अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
मनोरीच्या निःक्षारीकरण प्रकल्पा अंतर्गत समुद्रातून पाणी आणण्यासाठी सुमारे 20 मीटर खोलीवर 2.36 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. समुद्रातून पाणी आणताना सागरी जिवांना कोणताही उपद्रव होऊ नये यासाठी 50 मिमी जाळी असलेले फिरते स्क्रिन बसवण्यात येतील. पाणी आणणे आणि सोडणे या कामासाठी समुद्र तळाच्या खालून बोगदा खोदकामाऐवजी टनेलिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. समुद्र तळाखाली कोणत्याही प्रकारचे स्पह्ट करण्यात येणार नसल्याचे बांगर म्हणाले.
अशी आहेत प्रकल्पाची वैशिष्टय़े
प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (ईआयए) अहवालानुसार, प्रस्तावित जागेवर प्रवाळ खडक, समुद्री कासवांची अंडी घालण्याची ठिकाणे आढळलेली नाहीत. कांदळवनाचा पट्टा प्रकल्पापासून 505 मीटर अंतरावर आहे.
अतिखारट पाण्याची विल्हेवाट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) निर्धारित निकषांनुसार लावली जाणार आहे. प्रक्रियेनंतर समुद्रात सोडण्यात येणाऱया पाण्यातील उर्वरित क्लोरीन निष्क्रिय केले जाणार आहे.


























































