आम्ही शहा यांना घाबरत नाही, तुमचा काळ संपला; पवन खेरा यांचे भाजपला प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलणे हे विरोधकांचे उद्दिष्ट आणि जबाबदारीच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. ‘सरकार बदलणे आणि व्यवस्था बदलणे हाच विरोधकांचा हेतू आहे. आम्ही हे उघडपणे सांगत आहोत, मग राजनाथ सिंह यांना त्यावर उत्तर देण्याची गरज का वाटली?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘व्होट चोर, गद्दी छोड’ अभियानाचा उल्लेख करत पवन खेडा म्हणाले की, देशभरातून सरकारविरोधात आवाज उठवला जात आहे. या सरकारला पराभूत करून सत्ताबदल घडवून आणणे, हे विरोधकांचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलणे ही लोकशाहीतील सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना आता लोकशाहीची सवय राहिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून पवन खेरा यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये लाखो मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील खुलाशांनंतर निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले. ‘आता वेळ निघून गेली आहे. ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल,’ असे म्हणत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली.

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्ष किती काळ भाजपला पाठिंबा देणार, असा सवालही खेडा यांनी उपस्थित केला. चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे आणि जनता दल युनायटेड भाजपसोबत किती काळ राहणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. सत्ताधाऱ्यांच्या हातातून परिस्थिती निसटत असल्याचा दावाही त्यांनी केला. गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत बोलताना खेरा यांनी, ‘आम्ही शाह यांना घाबरत नाही. तुमचा काळ संपला आहे,’ असे म्हटल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या संसदीय पाठिंब्याच्या विधानावरही खेरा यांनी प्रश्न उपस्थित केले. विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश पाठिंब्याची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारने संपूर्ण माहिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली. दरम्यान, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनीही सरकार बदलणार असल्याचा दावा केला. घटनात्मक संस्थांवर नियंत्रण मिळवून कायमस्वरूपी सत्ता टिकवता येणार नाही, असे ते म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या विधानाला उत्तर देताना पवन खेरा आणि इम्रान मसूद यांनी निवडणुकीच्या माध्यमातून सरकार आणि व्यवस्था बदलणे हाच विरोधकांचा उद्देश असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.